Ads

अमृत पाणीपुरवठा योजना : मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेला दिली चुकीची माहिती

चंद्रपूर :चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत सुरू असलेल्या अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबत आजपर्यंत अनेक आरोप झालेले आहेत. आता हा मुद्दा थेट विधान परिषदेत पोहोचला. विधान परिषदेत नागपूर शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले व इतर काही विधान परिषद सदस्यांनी चंद्रपूर शहरातील अमृत पाणीपुरवठा योजनेला होत असलेला विलंब व कंत्राटदारा विरोधात केलेली कारवाई याबद्दल सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला. ह्या तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तर दिले. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी विधान परिषदेला चुकीचे उत्तर दिल्याचा आरोप चंद्रपूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केला.
Amrit Water Supply Scheme: Chief Minister gave wrong information to Legislative Council
एवढेच नव्हे तर अमृतचे कंत्राटदार संतोष मुरकुटे हे भाजपचे पदाधिकारी असून नुकतीच त्यांची परभणी ग्रामीण जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. भाजपशी संबंधित असल्यामुळेच सरकार व चंद्रपूर मनपा प्रशासन कंत्राटदार मुरकुटे यांची पाठराखण करीत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा देशमुख यांनी केला.
आमदार सुधाकर अडबाले यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेले उत्तर
अमृत योजनेचे काम सुरू करण्यापूर्वी विविध परवानग्या मिळण्यास वेळ लागल्याने तसेच कोविड महामारी मुळे योजना पूर्ण करण्यास विलंब झाला तसेच सदर योजनेचे भौगोलिक दृष्ट्या 95 टक्के काम पूर्ण झालेले असून शहरातील 95 टक्के भागात अमृत योजनेचा पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.शहरातील 15 झोन मध्ये अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली.

अमृत योजनेची वस्तुस्थिती
जून 2017 मध्ये मनपा प्रशासनाने अमृतच्या कामाचा कार्यादेश कंत्राटदार संतोष मुरकुटे यांना दिला. कामाची देखभाल करणारी एजन्सी म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नियुक्ती केली. करारानुसार दोन वर्षात म्हणजे 2019 पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते.करारात नमूद असलेला कामाचा अवधी संपल्यानंतर कोविडची साथ आली.त्यामुळे विविध परवानगी मिळण्यास वेळ लागल्याने किंवा कोविड महामारीमुळे काम करण्यास विलंब झाला ही माहिती चुकीची आहे. कारण कोविड महामारीच्या पूर्वी काम होणे अपेक्षित असतानाही 2023 पर्यंत काम पूर्ण झालेले नाही.
अमृत योजनेअंतर्गत काम करण्याकरिता शहरात 16 झोन तयार करण्यात आले. या 16 झोनमध्ये 8 जुन्या व 8 नविन अशा एकुण 16 पाण्याच्या टाक्या आहेत.यापैकी बंगाली कॅम्प येथील टाकीतून अमृत योजनेचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. इथे जुन्या पाईपलाईन मधून तीन ते चार हजार नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. घुटकाळा येथील टाकीवरून जवळपास चार ते पाच हजार नागरिकांना जुन्या पाईपलाईनने
पाणीपुरवठा होत आहे. या टाकीवरून अमृत पाणीपुरवठा योजनेची 'ट्रायल' पूर्ण झालेली नाही.
चंद्रपूर शहरात एकूण 90 ते 95 हजार मालमत्ता आहेत. दहा ते पंधरा हजार व्यावसायिक प्रतिष्ठान व ओपन स्पेस वगळल्यास 80 हजार च्या जवळपास घरे आहेत. 80 हजार घरांपैकी केवळ 60 ते 65 हजार घरांना अमृत योजनेची नळ जोडणी करण्यात आलेली आहे. म्हणजे शहरातील केवळ 80% घरांना नवीन योजनेची नळ जोडणी करण्यात आलेली आहे. अजून 20% च्या जवळपास घरांना नळ जोडणी झालेली नाही. नळ जोडणीच झालेली नसल्याने शहरातील 95 टक्के नागरिकांना अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा सुरू झाल्याची मुख्यमंत्र्यांनी दिलेली माहिती सुद्धा चुकीची आहे अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिलेली आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment