जावेद शेख (भद्रावती):-
पोलीस स्टेशन पडोली येथील गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत पडोली, रामनगर व चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करून २ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Crime News
Padoli police uncover 3 cases of housebreaking
पोलीस स्टेशन पडोली येथे दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी हरिदास दादाजी गेडाम (वय ४५, रा. साईकृपा नगरी, सोनुर्ली रिट, नायरा पेट्रोलपंपाजवळ, ता. जि. चंद्रपूर) यांनी घरफोडीची तक्रार दाखल केली होती. फिर्यादी हे सकाळी घराला कुलूप लावून सासुरवाडी ठाणेवासना (ता. पोंभुर्णा) येथे गेले होते. सायंकाळी घरी परतल्यावर घराचे लोखंडी कुलूप तुटलेले, दरवाजा उघडा व बेडरूममधील लोखंडी कपाट फोडलेले आढळून आले.
चोरट्यांनी घरातून सुमारे १० तोळे सोने, १४० ग्रॅम चांदी व २० हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात पोलीस स्टेशन पडोली येथे गुन्हा क्रमांक २१३/२०२५, कलम ३०५(अ), ३३१(३) बी.एन.एस. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान २५ डिसेंबर २०२५ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित आरोपी तिरुपती उर्फ लड्या अशोक दासलवार याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत सचिन उर्फ बोंडा विलास बदखल (रा. बल्लारशाह) याच्यासह घरफोड्या केल्याचे सांगितले.
पोलिसांनी आरोपींकडून १ लाख ६२ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली सुजुकी अॅक्सेस दुचाकी (क्र. MH-34-CS-2810) किंमत ८० हजार रुपये असा एकूण २ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस स्टेशन पडोली येथील गुन्हे शोध पथकातील पोहवा विनोद वानकर, पोअं प्रतिक हेमके, धिरज भोयर, श्रीनिवास वाभीटकर, समीर खाडे, राजा शेट्टी व अर्जुन मसराम यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
0 comments:
Post a Comment