Ads

महानगरपालिकेत 'फाऊंटेन घोटाळा'

चंद्रपूर: चंद्रपूर शहराच्या जटपूरा प्रभागातील प्रियदर्शनी चौक, हिंदुस्तान लालपेट प्रभागातील कामगार चौक, तुकुम प्रभागातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, शास्त्रीनगर प्रभागातील एसटी वर्कशॉप जवळील शहीद भगतसिंग चौक,भानापेठ प्रभागातील रामाळा तलाव या ठिकाणी फाउंटेन उभारणी व बांधकामाच्या कामा करिता 17 फेब्रुवारी 2023 रोजी चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एक निविदा प्रसिद्ध करण्यात आली. एकूण जवळपास सव्वादोन कोटी रुपये अंदाजपत्रकीय किंमत असलेल्या या निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी आज दिनांक 6 डिसेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला.
'Fountain Scam' in Municipal Corporation
मर्जीतल्या कंत्राटदाराला काम देण्यासाठी आयुक्त बिपिन पालीवाल यांनी या निविदा प्रक्रियेत अनेक नियम पायदळी तुडवले, अंदाजपत्रकामध्ये चार-चार पटीने कामाची किंमत वाढवून अवास्तव दर टाकले तसेच निविदा प्रक्रियेत अपात्र ठरणाऱ्या मर्जीतील कंत्राटदाराला पात्र केले व पात्र असलेल्या इतर कंत्राटदारांना हेतू पुरस्कार अपात्र ठरविल्याचा आरोप माजी नगरसेवक देशमुख यांनी केलेला आहे. या संपूर्ण घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून आयुक्त बिपिन पालीवाल यांचे विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी जनविकास सेनने केली. याबाबत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा जनविकास सेनेने दिलेला आहे.

असा झाला घोटाळा...

नागपूर येथील प्रशांत मद्दीवार यांच्या एजन्सीला फाउंटेन उभारणी व बांधकामाचे काम देण्यासाठी नियमांना बगल देण्यात आल्याचा आरोप देशमुख यांनी केलेला आहे.
प्रशांत मद्दीवार या एजन्सीकडे पुरेसा अनुभव नसल्यामुळे निविदा प्रक्रियेत जाणीवपूर्वक 'जॉईंट व्हेंचर' ची तरतूद करण्यात आली.
प्रशांत मद्दीवार या एजन्सीने दिल्ली येथील 'एक्वारियस टेक्नॉलॉजी' या एजन्सी सोबत जॉईन वेंचर चे पत्र सादर केले.
मात्र याच निविदा प्रक्रियेत 'एक्वारस टेक्नॉलॉजी' या एजन्सीने एम एस भांडारकर व अंकुश गोडबोले यांच्या एजन्सी सोबत सुद्धा जॉईन्ट वेंचरचे पत्र दिले. एका निविदा प्रक्रियेमध्ये एखाद्या एजन्सीला एकाच कंत्राटदारासोबत जॉईंट वेंचर करता येते. त्यामुळे एक्वारस टेक्नॉलॉजी सोबत जॉईन वेंचर करणाऱ्या तीनही एजन्सीला अपात्र ठरविणे गरजेचे होते. परंतु तसे करण्यात आले नाही.

निविदा प्रक्रियेत पात्र ठरण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालय किंवा महामंडळामध्ये निविदेतील कामाच्या किमतीच्या 80% चे एक काम किंवा 50% चे दोन काम किंवा 40% ची तीन कामे पूर्ण केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. प्रशांत मद्दीवार या एजन्सीने काम पूर्ण केल्याचे पत्र सादर केले नाही. केवळ चार लक्ष रुपयांचे कार्यादेश जोडले. निविदा प्रक्रियेत कार्यादेश ग्राह्य धरण्यात येत नाही. काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देणे आवश्यक असते. प्रशांत मद्दीवार या एजन्सीकडे पुरेशा किमतीचे काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र नसतानाही या एजन्सीला पात्र ठरवून प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी वेळ देण्यात आला.

या निविदा प्रक्रियेतील चार कामे प्रशांत मद्दीवार या एजन्सीला अंदाजपत्रकीय किमतीपेक्षा केवळ 0. 91 टक्के कमी दराने मंजूर करण्यात आले. प्रियदर्शनी चौक ,कामगार चौक व एसटी वर्कशॉप येथिल कामांची काही देयके सुद्धा अदा केली आहे. आयुक्त बिपिन पालीवाल यांनी अशा प्रकारे कंत्राटदाराशी संगनमत करून शासकीय निधीची अफरातफर केल्याने त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी देशमुख यांनी केलेली आहे.

कामाच्या प्रत्यक्ष किमतीपेक्षा अंदाजपत्रकात लाखो रुपयांची वाढ

निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करताना शेड्युल बी या प्रपत्रा मध्ये कामाचे सविस्तर दर दर्शवून त्याची बेरीज केली जाते. ही बेरीज म्हणजेच या कामाची एकूण अंदाजपत्रकीय किंमत असते.
अंदाजपत्रकीय किंमत 'बिल ऑफ कोटेशन' म्हणजेच बीओक्यू या प्रपत्रा मध्ये दर्शविण्यात येते. कंत्राटदार मध्ये दर टाकून निविदा प्रक्रियेत भाग घेतात.
शेड्युल बी मध्ये कामाची एकूण किंमत व बीयुकीमध्ये टाकलेली किंमत एकच असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र या निविदा प्रक्रियेत शेड्युल बी पेक्षा लाखो रुपयांनी अधिक किंमत बीओक्यू मध्ये टाकण्यात आली. अंदाजपत्रकामध्ये अशा प्रकारे लाखो रुपये वाढवून कंत्राटदाराला लाभ पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पात्र ठरणाऱ्या चांगल्या कंपन्यांना अपात्र केले

या निविदा प्रक्रियेत भाग घेणारी अहमदाबाद येथील क्लासिक फाऊंटेन व लखनऊ येथील त्रिवी फाउंटेन या एमएसएमई या वर्गात मोडणाऱ्या कंपन्या आहेत. अशा कंपन्यांना प्राधान्य देण्याचे सरकारचे धोरण आहे. या कंपन्यांना अनामत रक्कम मधून सूट सुद्धा देण्यात येते. या दोन्ही एजन्सीज कडे करोडो रुपयांची कामे करण्याचा अनुभव आहे. तसेच या दोन्ही एजन्सी स्वतः फाउंटेन तयार करणाऱ्या कंपन्या आहेत. मात्र या दोन्ही एजन्सीला निविदा प्रक्रियेत अपात्र ठरविण्यात आले.शरद काळे या नागपूरच्या एजन्सीला सुद्धा अशाच प्रकारे अपात्र केले. अपात्र ठरवताना कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार या एजन्सीज सोबत केला नाही. एकतर्फी कारवाई करण्यात आली. आपल्या मर्जीतील प्रशांत मद्दीवार व स्वयंभू या एजन्सीला लाभ पोहोचवण्यासाठी आयुक्त बिपिन पालीवाल यांनी सर्व नियम पायदळी तुडवले.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment