सादिक थैम वरोरा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तारण योजनेत बोगस शेतकऱ्याच्या नावाने शेतमाल ठेवल्याचे दाखवून ४६ लाख ६२ हजार १९० रुपयांच्या रकमेची अफरातफर करण्यात आली आहे. याप्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली असून वादग्रस्त सचिव चंद्रसेन शिंदे यांचा पदभार काढून घेण्यात आला आहे. दरम्यान कांदा घोटाळ्याची शाई वाळते न वाळते तोच तारण योजनेतील नवीन घोटाळा समोर आल्याने सहकार क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.
वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड मध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल तारण म्हणून ठेवला जातो. जेंव्हा शेतीतून शेतमाल निघतो तेव्हा दर कमी राहत असल्याने शेतकरी शेतमाल तारण या योजनेचा फायदा घेतात. या मोबदल्यात शेतकऱ्यांना संबंधित शेतमालाच्या हमीभावांपैकी ७५ टक्के रक्कम दिली जाते. उर्वरित २५ टक्के रक्कम जेव्हा सदर शेतमाल उच्चांकी दरावर असतो किंवा दर वाढत असताना शेतकऱ्याच्या इच्छेनुसार त्याची किंमत ठरवली जाते, तेव्हा त्या दरानुसार उर्वरित रक्कम शेतकऱ्याला दिली जाते. यासाठी आधी दिलेल्या रकमेमधून शासकीय दराने व्याज देखील घेतले जाते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा होत असल्याने शेतकरी तारण योजनेत आपला शेतमाल ठेवतात. याचा गैरफायदा घेत बाजार समितीचे कम्प्युटर ऑपरेटर कोमल गारघाटे यांनी तारण योजनेत शेतमाल न ठेवणाऱ्या बोगस शेतकऱ्यांची नावे नोंदवून काही नावाने ७५ टक्के रक्कम तर काही शेतकऱ्यांच्या नावाने शंभर टक्के रक्कम काढली आहे. संबंधित रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाल्यानंतर त्यातील नाममात्र रक्कम त्या शेतकऱ्याला देऊन उर्वरित रक्कम स्वतः ठेवून घेतली असे म्हटले जाते. कॉम्प्युटर ऑपरेटर बदलल्यानंतर त्याला कारण योजनेच्या रक्कम वाटपात तफावत आढळून आली त्यामुळे त्याने उलट तपासणी सुरू केली असता हा घोटाळा उघडकीस आला .दरम्यान प्राथमिक तपासणी दि.१७ मार्च २०२३ ते ४ एप्रिल २०२४ या कालावधीतील दहा नोंदी बोगस आढळून आले असून त्यांच्या माध्यमातून ४६ लाख ६२ हजार १९० रुपयांची अफरातफर झाल्याचे उघडकीस आला आहे. तसेच आता त्या आधीच्या नोंदी तपासल्या जात असून हा घोटाळा करोडो रुपयांच्या घरात असण्याची शक्यता आहे. दरम्यान हा प्रकार उघडकीस येताच संचालक मंडळाने घेतलेल्या बैठकीत वादग्रस्त सचिव चंद्रसेन शिंदे यांचा पदभार काढून सहाय्यक सचिव सचिन डहाळकर यांच्याकडे सोपवला आहे. सोबतच उपसभापती जयंत टेमुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीचे गठन करण्यात आले असून त्यात दत्ता बोरेकर, गणेश चवले, आणि राजेंद्र चिकटे या संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीने आज मंगळवार दि.१३ ऑगस्ट पासून चौकशीला प्रारंभ केला आहे. काही महिन्यांपूर्वीच वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा वाटप घोटाळा उघडकीस आला होता. दोन करोड रुपयांपेक्षाही अधिकच्या या घोटाळ्याची चौकशी व कार्यवाही सुरू असतानाच शेतमाल तारण योजनेतील घोटाळा पुढे आल्याने सहकार क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.
दोशी आढळणाऱ्या सर्वांवर कारवाई करू
शेतमाल तारण योजनेच्या माध्यमातून ४६ लाखांपेक्षाही अधिकचा घोटाळा झाला असल्याचे कृषीतून बाजार समितीचे उपसभापती तथा चौकशी समितीचे अध्यक्ष जयंत टेमुर्डे यांनी सांगितले. तसेच याप्रकरणी चौकशी समितीच्या माध्यमातून चौकशी सुरू असून त्यात जे-जे दोषी आढळतील त्या सर्वांवर कठोर कारवाई करू असा विश्वास त्यांनी पुण्यनगरीशी बोलताना दिला आहे.
घोटाळ्यात सचिव शिंदे आणि लेखापाल महाजन यांचा सहभाग ?
शेतमाल तारण योजनेतील घोटाळ्यात बाजार समितीचे सचिव चंद्रसेन शिंदे आणि लेखापाल किशोर महाजन यांचा सहभाग असल्याचे कॉम्प्युटर ऑपरेटर कोमल गारघाटे यांनी आपल्या बयानात सांगितले असल्याचे म्हटले जाते. प्रत्येक नोंदीवेळी दोन ते सव्वादोन लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकले जायचे. त्यामधून एक लाख रुपये सचिवाला तर ५० हजार रुपये लेखापाल आणि ५० हजार रुपये स्वतःला मिळायचे व इतर रक्कम शेतकऱ्याला दिली जात होती असा आरोप कोमल गारघाटे यांनी चौकशी समिती समोर लेखी स्वरूपात लिहून दिलेल्या भयानातून केला असल्याचे म्हटले जाते.
0 comments:
Post a Comment