सादिक थैम वरोरा: सोन्याच्या हृदयाचे नेते असलेल्या ताराचंद हिकरे यांच्यासारख्या राष्ट्रभक्त नेत्यांने निःस्वार्थपणे पक्षावर प्रेम केलं. त्यांनी आपले संपूर्ण जीवन पक्षासाठी समर्पित केले. माढेळीतील सभागृहाला त्यांचे नाव देणे म्हणजे त्यांच्या कार्यकतृत्वाचा गौरव आहे, अशा भावना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.
Naming the auditorium is a tribute to Tarachand Hickre's achievements
वरोरा तालुक्यात असलेल्या माढेळी येथे स्व. ताराचंद हिकरे सभागृहाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी रोहिणी देवतळे, चंद्रकांत गुंडावार, बाबा भागडे, डॉ. रमेश राजूरकर, डॉ.भगवान गायकवाड, माढेळीचे सरपंच देवानंद महाजन , उपसरपंच वनिता हुलके , प्रकाशजी मुथा,केशव बोरीकर,अमित चवले,गटविकास अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, ‘ताराचंद हिकरे यांचे नाव मिळाल्याने माढेळीतील सभागृहाची शान वाढणार आहे. त्यातून भविष्यातील पिढ्यांनाही ताराचंद हिकरे यांच्या निस्वार्थ सेवाभावाची प्रेरणा मिळत राहील.’ भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हिकरे परिवाराच्या पाठीशी उभा राहिल, अशी ग्वाही देखील ना.मुनगंटीवार यांनी दिली. पक्षनिष्ठा कशी असावी आणि मनाचा मोठेपणा कसा असावा, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ताराचंद हिकरे आहेत. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्यासोबत माझा संपर्क आला. त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले, अशी आठवणही ना. मुनगंटीवार यांनी सांगितली.
निधी अपुरा पडणार नाही
ताराचंद हिकरे यांचे व्यक्तिमत्व परिसासारखे होते. त्यामुळे त्यांच्या गावाच्या विकासासाठी ग्राम पंचायत आणि नागरिक जी काही मागणी करतील, ती पूर्ण करेन. माढेळी येथील सभागृहासह परिसरातील विकासासाठी कधीही निधी कमी पडणार नाही, असेही ना.मुनगंटीवार म्हणाले. हिकरे हे सेवाभावाने कार्य करणाऱ्या भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आदर्श आहेत, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
देखभालीसाठी समिती नेमावी
माढेळी येथील सभागृहाच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी समिती नेमण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी दिल्या. समाजातील गरीबांना अत्यंत माफक दरात सभागृह उपलब्ध करून देण्यात यावे. सभागृहाच्या शेजारी मोकळी जागा आहे. तेथे सौर ऊर्जा पॅनल उभारण्यात यावे. यासाठी लागणारे सहकार्य मी करेन, असेही मुनगंटीवार म्हणाले.
0 comments:
Post a Comment