चंद्रपुर :-चंद्रपूरात बंगाली समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. या शहराच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. हा प्रामाणिक आणि कष्टकरी समाज आहे. आपली संस्कृती, परंपरा आणि आपसातील प्रेम वृद्धिंगत करणारा हा स्नेहमिलनाचा कार्यक्रम असून बंगाली समाजाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
बंगाली कॅम्प येथे बंगाली समाज बांधवांच्या वतीने स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वंदना हातगावकर, सविता दंढारे, भारती दुधानी, माजी नगरसेविका शिला चव्हाण, चंपा बिश्वास, कौसर खान, कल्पना शिंदे आदींची प्रमुख्यतेने उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, मागील पाच वर्षांत आपण सर्व समाजाला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. बंगाली समाजाशी माझे नेहमी स्नेहपूर्ण संबंध राहिले आहेत. या समाजातील मोठा वर्ग आमच्यासोबत सक्रियतेने काम करत आहे. आमच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात या समाजातील कार्यकर्त्यांचा सहभाग राहिला आहे. या समाजातील समस्यांचीही आम्हाला जाणीव असून त्या सोडविण्यासाठी नेहमी आमचे प्रयत्न राहिले असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.
बंगाली संस्कृती म्हणजे एक समृद्ध वारसा आहे. आपल्या भाषेत, कलेत, साहित्यात, आणि संगीतामध्ये एक अनोखा आत्मभाव आहे. या स्नेहमिलनाच्या निमित्ताने आपल्या परंपरांना अभिवादन करत, आपल्या मुलांना आणि युवा पिढीला या वारशाचा अर्थ पटवून देणे आवश्यक आहे. आजचा कार्यक्रम म्हणजे आपल्यातील बंध वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न आहे. आपल्यातील युवा पिढीला सांस्कृतिक वारशाचे मोल समजावून देणे आणि या परंपरेचे महत्त्व पटवून देणे हे आपले कर्तव्य आहे.
समाजाला येणाऱ्या प्रत्येक अडचणीच्या वेळी मी आपल्या सोबत आहे आणि हक्काचा भाऊ म्हणून आपण यापूर्वीही मला हाक दिली आहे. पुढेही हे स्थान कायम ठेवावे मि आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही, असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला बंगाली समाजातील पुरुष व महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment