राजुरा : राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथील शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला Tiger attack केला. यात शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जंगू रामू आत्राम (५३), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना आज, शनिवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर महाराष्ट्र-तेलंगणा राज्य सीमेवर वसलेल्या आदिवासी अतिदुर्गम मागासलेला भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बगुलवाई येथील शेतकरी आत्राम सकाळी कापूस वेचण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी तेथे दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला.
आत्राम यांची बहीण दुपारच्या सुमारास शेतामध्ये गेली असता तिला त्यांचा मृतदहेच दिसून आला. घटनास्थळी रक्त, वाघाचे केस आणि पायाचे ठशे आढळून आले. घटनेची माहिती परिविक्षाधीन उपविभागीय वन अधिकारी पि. एन. अवदुतवार यांना देण्यात आली. त्यांनी वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय, राजुरा येथे पाठवण्यात आला. मृताची पत्नी ही दीड वर्षांपूर्वी आजाराने मृत पावली होती. त्यांना एक मुलगा असून तो मतिमंद आहे. या घटनेमुळे मुलाच्या डोक्यावरील वडिलांचे छत्रही हिरावले गेले.
0 comments:
Post a Comment