सिंदेवाही- तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलेवर वाघीणीने प्राण घातक हल्ला चढविला व यात तीनही महिलांचा दुर्दैवी अंत झाला. सदर घटना काल दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास सिंदेवाही वनपरिक्षेत्रा अंतर्गत उपवनक्षेत्र डोंगरगाव मधील चारगाव कक्ष क्रमांक 252 येथे घडली. मृतकांमध्ये कांता बुधाजी चौधरी (65) शुभांगी मनोज चौधरी (28 ) रेखा शालिक शेंडे (50) यांचा समावेश असून तीनही मृतक महिला या सिंदेवाही तालुक्यातील मेंढामाल येथील रहिवासी आहेत. अकस्मात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण मेंढा माल गावात शोककळा पसरली.
सदर घटनेची माहिती मिळतात क्षेत्र दौरावर असलेले विधिमंडळ पक्षनेते तथा लोकलेखा समिती अध्यक्ष व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज वाघ हल्यात मृत पावलेल्या तीनही महिलांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वन केले. अंत्यसंस्कार आटोपताच उपस्थित वनविभागाचे उपवनसंरक्षक राकेश सेपट, वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, पोलीस निरीक्षक राठोड तसेच उपस्थित गावकरी व वन विभाग कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी यांच्याशी तात्काळ चर्चा करून हल्लेखोर वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करा तसेच घडलेल्या घटनेचा गांभीर्याने विचार करून मृतकांच्या कुटुंबीयातील व्यक्तीला वनविभागाच्या सेवेत रुजू करून घ्या. व मृताच्या कुटुंबीयांना विभागाकडून देय असलेला मोबदला तात्काळ देण्याचे निर्देश यावेळी विधिमंडळ पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिले. सोबतच अशा दुर्दैवी घटना यापुढे घडू नये याकरिता विशेष उपाययोजना करण्याचेही त्यांनी यावेळी उपस्थित वनअधिकाऱ्यांना सांगितले. याप्रसंगी प्रामुख्याने सिंदेवाही काँग्रेस शहराध्यक्ष सुनील उट्टलवार , सिंदेवाही नगराध्यक्ष भास्कर नन्नावार, तसेच तालुका चै पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment