भद्रावती तालुका प्रतिनिधि :- दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी मा. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली चाइल्ड हेल्पलाइन 1098, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व सखी – वन स्टॉप सेंटर, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बालक दिन सप्ताह आणि बालविवाह मुक्त भारत अभियान निमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन कर्मवीर उच्च माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, गवराळा (भद्रावती) येथे करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी. दोहातरे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून माननीय बाल कल्याण समिती सदस्या श्रीमती वनिता घुमे उपस्थित होत्या. तसेच अॅड. प्रीती खातखेडे (सखी वन स्टॉप सेंटर), प्रदीप वैरागडे (चाइल्ड हेल्पलाईन 1098 सुपरवायझर), प्रतिभा मडावी (जिल्हा बाल संरक्षण कक्ष), तसेच विद्यालयातील शिक्षकवृंद कार्यक्रमास उपस्थित होते.
या जनजागृती उपक्रमात विद्यार्थ्यांना बाल कल्याण समितीचे कार्य, बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2005, POCSO अधिनियम 2012, चाइल्ड हेल्पलाइन 1098, महिला हेल्पलाइन 181, सखी वन स्टॉप सेंटर आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या कार्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये बालसुरक्षा, बालहक्क आणि बालविवाह प्रतिबंधाबाबत योग्य जागरूकता निर्माण करणे हा होता. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध शंकांचे निरसन करून घेतले.
या उपक्रमामुळे समाजातील बालकांच्या संरक्षणासंबंधी कायदे व सुविधा यांविषयी जागरूकता मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आयोजकांनी सांगितले.
0 comments:
Post a Comment