राजुरा | प्रतिनिधी :-
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुका अवैध रेती उत्खननासाठी कुप्रसिद्ध होत चालला असून, शासनाच्या तिजोरीत कोट्यवधींची लूट करणारा रेती माफियांचा खेळ अनेक वर्षांपासून रात्रीच्या अंधारात बिनधास्त सुरू होता. महसूल व पोलीस यंत्रणेतील काही ‘अदृश्य हातां’च्या आशीर्वादाने चालणारा हा बेकायदेशीर व्यवसाय कितीही तक्रारी, निवेदने आणि वृत्तांकन होऊनही थांबत नव्हता. मात्र अखेर प्रशासनाला जाग येताच रेती माफियांना जोरदार दणका बसला आहे.Midnight raid on sand mafia in Rajura!
दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी रात्री ठीक ११ वाजता राजुरा तालुक्यातील मूर्ती गाव परिसरात तहसीलदार ओमप्रकाश गौड तथा मंडळ अधिकारी सुभाष साळवे यांनी अचानक छापा टाकत अवैध रेती उत्खनन व साठवणीचा भांडाफोड केला.
जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेसचे नवनियुक्त उपजिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून रेवर्धा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर रेती उपसा करून थेट डंपिंग सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. माहिती मिळताच त्यांनी प्रशासनाला थेट फोन करून जाब विचारला. लोकप्रतिनिधींच्या दबावानंतर महसूल प्रशासन ॲक्शन मोडवर आले आणि प्रत्यक्ष घटनास्थळी धडक दिली.
छाप्यावेळी रेती माफियांचा बिनधास्त धंदा रंगात असतानाच प्रशासन पथक पोहोचले. कारवाईत
जेसीबी (MH-CD-6990)
बिना नंबर प्लेटचा कुबोटा ट्रॅक्टर
सुमारे ८ ब्रास अवैध रेती साठा
जप्त करण्यात आला. मात्र नेहमीप्रमाणे मोठे हायवा चालक अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले. तरीही MH-34-BZ-2784 व MH-34-BZ-2782 हे वाहन क्रमांक नोंदविण्यात आले असून, संबंधित वाहनमालकांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे — जर रात्री ११ वाजता एवढ्या सहजतेने रेती उत्खनन सुरू होते, तर इतकी वर्षे प्रशासन नेमके काय करत होते? कोणाच्या आशीर्वादाने हा अवैध धंदा फोफावला? रेती माफियांना संरक्षण देणारे अधिकारी व दलाल कोण, याची चौकशी होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
सुरज ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या निर्भीड भूमिकेमुळे रेती माफियांना मोठा हादरा बसला असून, आता केवळ वाहने जप्त करून थांबू नये, तर सूत्रधारांवर, आर्थिक लाभार्थींवर व संरक्षण देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.
ही कारवाई केवळ ‘दाखवण्यापुरती’ न राहता, राजुरातील रेती माफियांचे पूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त होईल का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 comments:
Post a Comment