Ads

धुळीत व्यापाऱ्यांचा व्यवसाय; जड वाहतुकीने बाजारपेठ हैराण..

 भद्रावती, जावेद शेख:-
भद्रावती शहरातील मुख्य बाजारपेठ व हनुमान नगर रोड परिसर सध्या जड वाहतुकीच्या धुरळ्यात अक्षरशः झाकला गेला आहे. Traders' Businesses Buried in Dust; Heavy Traffic Plagues the Marketplace.
बाजारपेठेच्या मध्यभागातून हायवा, दहा चाकी ट्रक आणि तब्बल २२ चाकी ट्रेलरसह , हायवा सुरू असलेली वर्दळ पाहता ही बाजारपेठ आहे की मालवाहतूक मार्ग, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. व्यापाऱ्यांचा व्यवसाय धुळीत जात असताना प्रशासन मात्र पत्रव्यवहाराच्या कारवाईत व्यस्त असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.
     बाजार वार्ड येथील व्यवसायिक युवराज खामकर यांनी संताप व्यक्त करत सांगितले की,
“माझे बुक डेपो आणि जनरल स्टोअर्सचे दुकान या रस्त्यावर अनेक वर्षांपासून आहे. पण जड वाहतुकीमुळे उडणाऱ्या धुळीने दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य खराब होत आहे. दिवसभर काऊंटरवर धुळीचा थर साचतो. या धुळीमुळे श्वसनासंबंधी त्रास जाणवू लागला असून हातांवर खपल्या येण्यासारखे त्रासही वाढले आहेत.”
     दुसरे दुकानदार मोहन पांढरे यांनीही आपली व्यथा मांडताना सांगितले की,
“माझे कॉम्प्युटर आणि ज्वेलर्सचे दुकान आहे. धुळीमुळे इलेक्ट्रॉनिक साहित्याचे नुकसान होत आहे. कॉम्प्युटर वारंवार खराब होत आहेत. लाखो रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता जड वाहतुकीमुळे आधीच खराब होऊ लागला आहे.”
स्थानिक व्यापारी अमान शेख म्हणाले,
“या रस्त्यावर जामा मस्जिद आणि दुर्गा मंदिर असल्यामुळे भाविकांची सतत वर्दळ असते. याच मार्गाने शाळकरी मुले आणि बाजारपेठेतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. अशा ठिकाणी जड वाहनांची वर्दळ सुरू राहणे म्हणजे अपघाताला निमंत्रणच आहे.”
डाॅ. मनोज हक्के यांनीही याकडे लक्ष वेधत सांगितले की,
“हा रस्ता भद्रावती शहरातील महत्त्वाचा मार्ग असून येथे आठवडी बाजार भरतो. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी असते. अशा परिस्थितीत जड वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे.”
    दरम्यान, भाजयुमोचे प्रदेश सचिव तथा जनसेवक इम्रान अफजल रफीक खान यांनी या संपूर्ण प्रकारावर प्रशासनाला जाब विचारला आहे. त्यांनी बाजारपेठेत सुरू असलेल्या जड वाहतुकीबाबत निवेदन दिल्यानंतर तहसीलदार कार्यालयाकडून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) चंद्रपूर आणि पोलीस स्टेशन भद्रावती यांना पत्र पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
     मात्र प्रत्यक्षात बाजारपेठेतून जड वाहनांची वर्दळ सुरूच असल्याने शहरात प्रशासनाच्या कारभारावर खिल्ली उडवणाऱ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. “पत्रे गेली, पण ट्रेलर थांबले नाहीत,” अशी टोलेबाजी बाजारपेठेत ऐकू येत आहे. केवळ पत्रव्यवहाराने धुळ कमी होणार का, असा सवाल व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
     याबाबत इम्रान खान म्हणाले,
“मुख्य बाजारपेठ हा शहराचा हृदयस्थ भाग आहे. येथे जड वाहनांची वर्दळ सुरू राहणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. संबंधित विभागांनी तातडीने समन्वय साधून जड वाहतुकीवर नियंत्रण आणावे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही. गरज पडल्यास व्यापाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही.”
     दरम्यान, व्यापारी आणि नागरिकांचे म्हणणे आहे की केवळ पत्रव्यवहार करून प्रश्न सुटणार नाही. बाजारपेठेत प्रत्यक्ष कारवाई करून जड वाहनांना आळा घालणे आवश्यक आहे. अन्यथा धुळीत जात असलेला व्यापाऱ्यांचा व्यवसाय, नागरिकांचे आरोग्य आणि बाजारपेठेची सुरक्षितता यांचा प्रश्न अधिक गंभीर होणार आहे.
    लढा सुरूच राहणार
मुख्य बाजारपेठेत सुरू असलेल्या जड वाहतुकीविरोधात व्यापारी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून ठोस कारवाई होईपर्यंत आवाज उठवला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांसोबत इम्रान अफजल रफीक खान यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून “बाजारपेठ वाचविण्याचा लढा सुरूच राहणार”, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment