जावेद शेख भद्रवती प्रतिनिधी : वरोरा-वणी हायवेवर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी माजरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, सीसीटीव्हीच्या आधारे फरार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी फिर्यादी वाल्मिक अन्याजी बोंडे (रा. कुचना) हे घरी असताना गावातील पिंटू मोडक यांनी त्यांना माहिती दिली की, त्यांचा मुलगा धिरज वाल्मिक बोंडे हा गणेश चोपणे यांच्या पाणठेल्याजवळून हायवे रोड क्रॉस करत असताना वरोरा कडून वणीकडे जाणाऱ्या ‘साई ट्रॅव्हल्स’ (क्र. MH-29-AW-0146) या वाहनाने जोरदार धडक दिली. अपघातानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला.
ही माहिती मिळताच फिर्यादी घटनास्थळी पोहोचले आणि जखमी धिरज याला तात्काळ अँम्बुलन्सने वरोरा येथे व त्यानंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान 19 एप्रिल 2026 रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास धिरजचा मृत्यू झाला.
फिर्यादीच्या तक्रारीवरून माजरी पोलीस ठाण्यात अप.क्र. 92/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 106(1), 281, 125(A), 125(B) तसेच मोटार वाहन कायदा कलम 134(B), 184 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, अपघातानंतर पसार झालेल्या चालकाचा शोध घेण्यासाठी माजरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून संबंधित ट्रॅव्हल्स वाहन व चालकाची ओळख पटवून त्याला ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत माजरी ठाणेदार, पोलीस उपनिरीक्षक चोपणे, सफौ पावडे, पोलीस अंमलदार मिलमिले, अनिस शेख, कोटरंगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक तसेच एसडीपीओ वरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हरिदास चोपणे करीत आहेत.
0 comments:
Post a Comment