वरोरा (जावेद शेख, प्रतिनिधी) – चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-भद्रावती मतदारसंघात सध्या महत्त्वाची प्रशासकीय प्रक्रिया सुरू असून, तब्बल 59,668 मतदारांचे 2005 च्या मतदार यादीसोबत मॅपिंग अद्याप अपूर्ण असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संबंधित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकूण 2,87,413 मतदारांपैकी सुमारे 80 टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असले तरी उर्वरित 20 टक्के मतदारांचे मॅपिंग प्रलंबित आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या 14 मे 2026 रोजीच्या आदेशानुसार राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण (S.I.R.) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत, 31 मे 2026 पर्यंत मॅपिंग पूर्ण न केल्यास आणि आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित मतदारांची नावे वगळली जाऊ शकतात, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
मॅपिंग न झालेल्या मतदारांची मतदान केंद्रनिहाय यादी तयार करण्यात आली असून ती QR कोड तसेच ऑनलाईन लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित मतदारांनी आपले नाव तपासून तात्काळ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क साधावा.
तसेच, मतदारांनी 2005 च्या मतदार यादीतील पार्ट नंबर व सिरीयल नंबर शोधून BLO यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यादीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही नमूद करण्यात आले आहेत.
मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वरोरा संदीप भस्के यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वेळेत मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करून आपला मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवावा.
0 comments:
Post a Comment