चंद्रपूर (दि. ०३ जून २०२६): चंद्रपूर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) भद्रावती हद्दीत धडक कारवाई करत तब्बल १६८.९४ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रोन) ड्रग्जसह कार जप्त केली आहे. या कारवाईत नागपूर येथील एका तस्कराला अटक करण्यात आली असून, एकूण ₹१४,११,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.MD Durgs big bag seized! Nagpur smuggler arrested by Chandrapur LCB; 14 lakh worth of goods seized
पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंदे, विशेषतः अंमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ०२ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली की, नागपूर येथील अब्दुल सिराज अब्दुल गफ्फार हा मोठ्या प्रमाणात एम.डी. ड्रग्ज घेऊन भद्रावतीकडे येणार आहे.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तत्काळ कारवाईची रणनीती आखली. कायदेशीर परवानग्या पूर्ण करून नागपूर-भद्रावती मार्गावरील जमघट हॉटेल परिसरात सापळा रचण्यात आला.
०३ जून रोजी पहाटे ००:३५ वाजताच्या सुमारास संशयित पांढऱ्या रंगाची होंडा अमेझ कार घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी तात्काळ नाकेबंदी करून वाहन ताब्यात घेतले. चालकाची चौकशी केली असता त्याने आपली ओळख अब्दुल सिराज अब्दुल गफ्फार (वय ४०, रा. तुकडोजी चौक, नागपूर) अशी सांगितली.
यानंतर राजपत्रित अधिकारी यांच्या उपस्थितीत वाहनाची व आरोपीची झडती घेण्यात आली असता, त्याच्या ताब्यातून १६८.९४ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज पावडर (अंदाजे किंमत ₹८,५०,०००/-) आढळून आली. तसेच तस्करीसाठी वापरण्यात आलेली होंडा अमेझ कारही जप्त करण्यात आली. एकूण जप्तीची किंमत ₹१४,११,०००/- इतकी आहे.
या प्रकरणी भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत कलम ८(क), २२(क) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:
पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली विनोद भुरले, सुनील गौरकार, सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनिकांत पुट्ठावार, दीपक डोंगरे, इमान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार आदींचा सहभाग होता.
एकूण पाहता, चंद्रपूर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले असून, जिल्ह्यातील ड्रग्ज नेटवर्कवर मोठा आघात झाल्याची चर्चा आहे.
0 comments:
Post a Comment