भद्रावती (प्रतिनिधी) जावेद शेख : चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी पोलीस स्टेशनने अंमली पदार्थांविरोधात उल्लेखनीय कारवाई करत गाजरी कॉलरी परिसरातून गांजा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत १२२.६४ ग्रॅम गांजा, मोपेड, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ₹८८,९५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर गांजाचा पुरवठा करणारी महिला आरोपी फरार असून तिचा पोलीस शोध घेत आहेत.
Major action by Majri police; Ganja sale racket busted in Gajari colliery, goods worth ₹88,950 seized
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२६ रोजी रात्री गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांच्या नेतृत्वाखाली शासकीय पंचांसह गाजरी कॉलरी परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी एमएच-३४ बीवाय-४०५७ क्रमांकाच्या टीव्हीएस ज्युपीटर मोपेडवरून संशयास्पदरीत्या फिरणारे समधन सिंग रामसिंग टाक (वय ३३, रा. गोकुलनगर, वणी, जि. यवतमाळ) आणि रोशन तेजराम मेश्राम (वय २३, रा. दुर्गापूर, चंद्रपूर) यांना ताब्यात घेऊन त्यांच्या वाहनाची झडती घेतली.
झडतीदरम्यान वाहनाच्या डिक्कीत १२२.६४ ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच आरोपींकडून ₹२५० रोख, विवो कंपनीचा मोबाईल (किंमत ₹१०,०००) आणि टीव्हीएस ज्युपीटर मोपेड (किंमत ₹७५,०००) असा एकूण ₹८८,९५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीत आरोपींनी हा गांजा उषादेवी शिवशंकर वर्मा (वय ४५, रा. बांधा दफाई, माजरी कॉलरी) हिच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. त्यानुसार तिच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून ती सध्या फरार आहे.
या प्रकरणी माजरी पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक १३२/२०२६ अंतर्गत एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(C), 20(B) व 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी व माजरी पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
0 comments:
Post a Comment