चंद्रपूर | प्रतिनिधी
तळोधी वनपरिक्षेत्रातील सावंगी (बडगे) गावाजवळ रविवारी दुपारी घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. गोसेखुर्द कालव्याजवळ गुरे चारण्यासाठी गेलेल्या ३० वर्षीय गुराख्यावर पट्टेदार वाघाने अचानक झडप घालत जीवघेणा हल्ला केला. मात्र मृत्यू समोर उभा ठाकला असतानाही धैर्य न गमावता आरडाओरडा केल्याने आणि ग्रामस्थांनी क्षणार्धात धाव घेतल्याने त्यांचा जीव थोडक्यात बचावला. 'होता जिवा म्हणून वाचला शिवा' या म्हणीचा प्रत्यय या घटनेत अक्षरशः आला."Standing in front of death... but bravely lost the tiger! The thrilling life of a cowherd in Savangit is saved"
मिळालेल्या माहितीनुसार, कांचन प्रकाश खोब्रागडे (वय ३०, रा. सावंगी-बडगे) हे नेहमीप्रमाणे म्हैस व बैल घेऊन जंगल परिसरात चराईसाठी गेले होते. दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास गोसेखुर्द कालव्याजवळ पोहोचताच झुडपात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली.
वाघाने काही क्षणांतच कांचन खोब्रागडे यांना खाली पाडून फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र गंभीर प्रसंगातही त्यांनी धैर्य सोडले नाही. त्यांनी मोठ्याने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. त्यांच्या किंकाळ्या ऐकून जवळच असलेले रवी वाडगुरे यांनी जीवाची पर्वा न करता घटनास्थळी धाव घेतली.
ग्रामस्थांच्या धाडसाने टळली दुर्घटना
रवी वाडगुरे यांच्या धाडसामुळे आणि त्यानंतर घटनास्थळी धावलेल्या ग्रामस्थांच्या मदतीने वाघाला पिटाळून लावण्यात यश आले. त्यामुळे कांचन खोब्रागडे यांचा जीव वाचला. काही क्षणांचा विलंब झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
गंभीर जखमी अवस्थेतील कांचन खोब्रागडे यांना प्रथम तळोधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सिंदेवाही येथे हलविले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
परिसरात भीतीचे सावट
गोसेखुर्द कालवा परिसरात यापूर्वीही वाघाचा वावर वारंवार आढळून आला आहे. अनेक वेळा गुरांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र आता थेट माणसावर हल्ला झाल्याने सावंगी (बडगे) आणि परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाकडे ग्रामस्थांची मागणी
या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाने तातडीने परिसरात गस्त वाढवून संबंधित वाघाचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली आहे. जंगलालगतच्या गावांमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचीही मागणी होत आहे.
'मानव–वन्यजीव संघर्ष' पुन्हा ऐरणीवर
या घटनेमुळे जंगलालगतच्या गावांमध्ये वाढता वन्यप्राण्यांचा वावर आणि मानव–वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शेतकरी, गुराखी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने दीर्घकालीन आणि ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
0 comments:
Post a Comment