चंद्रपूर | प्रतिनिधी :-
स्थानिक गुन्हे शाखा (LCB) चंद्रपूरने मोठी कामगिरी करत आंध्र प्रदेशातील एका सराईत आंतरराज्यीय घरफोड्या आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ६ घरफोडी आणि ३ मोटारसायकल चोरीचे असे एकूण ९ गुन्हे उघडकीस आले असून सुमारे ₹४.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव चिन्नाबाबू व्यंकटेश्वरलु गोरेला (वय ३२), रा. राजमहेंद्रवरम, आंध्र प्रदेश असे असून त्याच्यावर यापूर्वी आंध्र प्रदेशात ४१ आणि तेलंगणात ६ असे एकूण ४७ घरफोडी व चोरीचे गुन्हे नोंद असल्याचे तपासात समोर आले आहे.
रेल्वेने यायचा, दुचाकी चोरायचा आणि घरफोडी करून पसार व्हायचा!
तपासात आरोपीची धक्कादायक कार्यपद्धती उघड झाली. आरोपी रेल्वेने चंद्रपूर परिसरात येत असे. रेल्वे स्टेशन परिसरातून मोटारसायकल चोरी करून त्याच वाहनाचा वापर करत बंद घरे शोधून घरफोडी करत असे. चोरीनंतर दुचाकी पुन्हा स्टेशन परिसरात सोडून रेल्वेने मूळ गावी परत जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
असा झाला गुन्ह्यांचा छडा
बल्लारपूर येथील घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. विशेष पथकाने आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रवरम येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.
जप्त मुद्देमाल
३ चोरीच्या मोटारसायकली
अंदाजे ₹३.२० लाखांचे सोन्याचे दागिने (हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू)
₹२५ हजारांचे चांदीचे दागिने
एकूण ₹४.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
पोलीसांनी आरोपीला पुढील तपासासाठी बल्लारपूर पोलीसांच्या ताब्यात दिले असून, त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
0 comments:
Post a Comment