राजुरा, ता.प्र. -
राजुरा येथे दिनांक २६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून यंदा प्रथमच एआय बेस्ड स्मार्ट पोलिसिंग प्रणाली असलेल्या ‘एआय सर्व्हिलान्स व्हेईकल’चा वापर करण्यात आला. नुकत्याच घडलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आलेल्या या पोलिसिंग व्यवस्थेने मिरवणुकीतील सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या वाहनामध्ये फेस रिडींग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोलिसांच्या डेटाबेसमधील गुन्हेगारांची ओळख पटविण्याची सुविधा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. The attraction of ‘AI Surveillance Vehicle’ in Rajura’s Ganesh Visarjan procession
चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारी नोंदींमधील माहिती संगणकीकृत करण्यात आली असून, निर्धारित अंतराच्या परिसरात डेटाबेसमधील व्यक्ती आढळल्यास प्रणालीद्वारे पोलिसांना तत्काळ सूचना मिळण्याची व्यवस्था असल्याचे सांगण्यात आले. गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान उपस्थित पत्रकारांना या अत्याधुनिक प्रणालीची माहिती देण्यात आली. राजुरा उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस कुमार सुशांत, राजुरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार नितीन चिंचोळकर आणि चंद्रपूर सायबर सेलचे पोलिस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार साहिल आवारी व गुणवंत मुंडके यांनी या यंत्रणेची माहिती दिली. पारंपरिक पोलिसिंगसोबत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाची जोड देत राजुरा पोलिसांनी स्मार्ट पोलिसिंगच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
0 comments:
Post a Comment