भद्रावती, जावेद शेख प्रतिनिधी-
चिरादेवी–भद्रावती मार्गावर नाकाबंदी करून भद्रावती पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीविरोधात कारवाई केली. या कारवाईत रेतीने भरलेला हायवा ट्रक जप्त करण्यात आला असून, ट्रक व रेती असा एकूण ३५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. कारवाईत ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले असून, वाहनमालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभारी अधिकारी पोलीस डीवायएसपी सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलीस पथक दि.०१ सप्टेंबर रोजी गस्तीवर असताना चिरादेवी रोडने भद्रावतीच्या दिशेने अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चिरादेवी रोडवर नाकाबंदी केली. यावेळी MH 34 BG 2255 क्रमांकाचा हायवा ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये शासकीय परवाना अथवा रॉयल्टी नसलेली सुमारे ७ ब्रास रेती आढळून आली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात सदर रेती डोंगरगाव (सिंदेवाही) येथून अवैधरीत्या उत्खनन करून विक्रीसाठी नेली जात असल्याचे समोर आले.
३५.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त
हायवा ट्रक (MH 34 BG 2255) – अंदाजे ३५ लाख रुपये
अवैध रेती, ७ ब्रास – अंदाजे ४२ हजार रुपयेएकूण मुद्देमाल – ३५ लाख ४२ हजार रुपये चालक ताब्यात; मालकाचा शोध या प्रकरणात चेतन श्रावण चचाणे (२७), रा. वेगाव, ता. मारेगाव, जि. यवतमाळ, याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर शामकांत सिताराम थेरे, रा. मोरवा, ता. जि. चंद्रपूर, हा वाहनमालक असून त्याचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात कलम 303(2), 3(5) बीएनएस, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48(7), 48(8) तसेच गौण खनिज अधिनियम 1952 मधील कलम 1, 2, 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक सचिन खेत्रे यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार देवानंद डुकरे, प्रशांत शेंद्रे, अनुप आस्टूनकर, गोपाल आतकुलवार, विजय तलांडे महिला पोलिस अंमलदार मोनाली गारघाटे आदींनी पार पाडली.
पुढील तपास भद्रावती पोलीस करीत असून सलग कार्यवाहीमुळे अवैध व्यावसायिक धास्तावल्याचे चित्र दिसून येत आहे.
0 comments:
Post a Comment