पोंभूर्णा - एखाद्या कुटुंबावर अचानक संकट कोसळते, तेव्हा शब्दांपेक्षा मदतीचा हात अधिक मोठा आधार ठरतो. पतीच्या कॅन्सरच्या निदानानंतर आयुष्य एका क्षणात अनिश्चिततेच्या वळणावर आलेल्या सोनाली मुकुंदा भुरसे यांच्या कुटुंबासाठी अशाच कठीण काळात आ. सुधीर मुनगंटीवार मदतीला धावून आले. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार आणि यशस्वी शस्त्रक्रियेसाठी त्यांनी केलेल्या मदतीमुळे आज त्यांचे पती मुकुंदा भुरसे सुखरूप आहेत. या मदतीची कृतज्ञता मनात घेऊन पोंभूर्णा येथील एकल महिला संमेलनात सोनाली भुरसे यांनी आ. मुनगंटीवार यांचा सत्कार केला. आपल्या पतीला नवजीवन मिळवून देणाऱ्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी आ. मुनगंटीवार यांच्या हातावर राखी बांधली आणि भावाच्या नात्याने त्यांचे आभार मानले. या प्रसंगाने संपूर्ण वातावरण भावूक झाले.
“A thread of Rakhi on the hand that gave new life to her husband; Tears of gratitude in Sonali Bhurse’s eyes!”
पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील रहिवासी असलेल्या सोनाली मुकुंदा भुरसे या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महिला आघाडीच्या पोंभूर्णा तालुकाध्यक्ष आहेत. सुमारे तीन महिन्यांपूर्वी त्यांचे पती मुकुंदा भुरसे यांना कॅन्सरचे निदान झाले. कुटुंबासाठी हा अत्यंत धक्कादायक आणि कठीण काळ होता. उपचाराची चिंता, आजाराचे गांभीर्य आणि पुढील परिस्थिती यामुळे संपूर्ण कुटुंब चिंतेत होते. या कठीण प्रसंगी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. मुकुंदा भुरसे यांच्या उपचारासाठी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात व्यवस्था करण्यासाठी त्यांनी मदत केली. तेथे त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आणि उपचारानंतर ते आता सुखरूप आहेत. संकटाच्या काळात मिळालेला हा आधार भुरसे कुटुंबासाठी केवळ उपचारांची मदत नव्हती, तर निराशेच्या क्षणी मिळालेली आशेची नवी किरण होती.
आज आ. मुनगंटीवार पोंभूर्णा येथे एकल महिला संमेलनासाठी आले असताना सोनाली भुरसे यांनी त्यांची भेट घेतली. मनात साठवून ठेवलेली कृतज्ञता त्यांनी शब्दांत व्यक्त करण्यासोबतच कृतीतूनही व्यक्त केली. त्यांनी आ. मुनगंटीवार यांचा सत्कार केला आणि पतीच्या उपचारासाठी मदत करून त्यांचे प्राण वाचविल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या हातावर राखी बांधली. राखीच्या त्या एका धाग्यात केवळ औपचारिकता नव्हती; त्यामध्ये विश्वास, माणुसकी, कृतज्ञता आणि भावाच्या नात्याची भावना होती. संकटाच्या काळात आधार देणाऱ्या व्यक्तीशी निर्माण झालेले हे नाते राजकीय चौकटींपलीकडचे होते.
सोनाली भुरसे या वेगळ्या राजकीय पक्षाशी संबंधित असतानाही त्यांच्या कुटुंबावर संकट आले तेव्हा आ. मुनगंटीवार यांनी मदतीचा हात पुढे केला. राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन संकटात माणूस म्हणून धावून जाणे, हीच खरी लोकसेवा असल्याची प्रचिती या प्रसंगातून आली. जनतेच्या सुख-दुःखात सदैव सहभागी होणे आणि संकटाच्या क्षणी मदतीसाठी पुढे येणे, ही आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्यपद्धती राहिली आहे. आरोग्याच्या संकटापासून शिक्षण, रोजगार आणि इतर अडचणींपर्यंत गरजू नागरिकांच्या पाठीशी उभे राहण्याची त्यांची भूमिका या प्रसंगातून पुन्हा अधोरेखित झाली.
विशेष म्हणजे, एकल महिला संमेलनात आ. मुनगंटीवार यांनी “एकही महिला एकटी नाही” हा विश्वास व्यक्त केला. संकटात असलेल्या प्रत्येक महिलेच्या पाठीशी भाऊ म्हणून उभे राहण्याचा निर्धार त्यांनी याच कार्यक्रमात व्यक्त केला. त्याच कार्यक्रमात एका महिलेने आपल्या पतीच्या उपचारासाठी मिळालेल्या मदतीची कृतज्ञता व्यक्त करत आ. मुनगंटीवार यांना भावाच्या नात्याने राखी बांधली. त्यामुळे त्यांच्या संदेशाला एका हृदयस्पर्शी प्रसंगाची जिवंत जोड मिळाली. एका कुटुंबाच्या कठीण काळात मिळालेला आधार, एका पतीला मिळालेले नवजीवन आणि त्या मदतीबद्दल एका पत्नीच्या मनात निर्माण झालेली कृतज्ञता या सगळ्यांचा साक्षीदार ठरलेला हा क्षण पोंभूर्ण्यातील एकल महिला संमेलनातील सर्वांत भावस्पर्शी क्षण ठरला. माणुसकीच्या नात्याला पक्षीय भिंती नसतात आणि संकटाच्या वेळी धावून जाणारा हातच खऱ्या अर्थाने आपला असतो, याची जाणीव या प्रसंगाने करून दिली.
0 comments:
Post a Comment