जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भद्रावती तालुक्यातील मौजा पिर्ली येथे आज (दि. 8) पीक कापणी प्रयोगाच्या पर्यवेक्षणासाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी नथ्थू महादेव डाखरे यांच्या शेतात प्रत्यक्ष उपस्थित राहून पीक कापणी व मळणीची प्रक्रिया जाणून घेतली. तसेच दुष्काळी परिस्थितीत पिकांच्या उत्पादनाची अचूक नोंद घेण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतक-यांशी संवाद साधला.
पुढे जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, जिल्ह्यात कमी पर्जन्यमान आणि पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत पीक कापणी प्रयोगातून मिळणारी आकडेवारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे पीक उत्पादनाच्या नोंदीमध्ये अचूकता आणि पारदर्शकता राखावी. या माहितीचा उपयोग शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी होणार असल्याने ही कार्यवाही काटेकोरपणे करावी.
नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे वस्तुनिष्ठ पद्धतीने करून उर्वरित कार्यवाही गतीने पूर्ण करावी. एकही पात्र नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रक्रियेपासून वंचित राहणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक नुकसानीचे अचूक मूल्यांकन, पीक कापणी प्रयोग आणि पंचनाम्यांची कार्यवाही महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने संबंधित विभागांनी समन्वय राखून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असेही जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार यांनी परिसरातील इतर पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचे निरसन करताना त्यांनी दुष्काळी परिस्थितीत पिकांचे योग्य व्यवस्थापन, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर, जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे तसेच पीक संरक्षणाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
भद्रावती तालुक्यात 19 हजार 727 हेक्टरवरील पंचनामे पूर्ण : भद्रावती तालुक्यात एकूण 38 हजार 819.70 हेक्टर पेरणी क्षेत्र असून, खातेदारांची संख्या 37 हजार 543 आहे. दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने तालुक्यात शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून, आतापर्यंत 19 हजार 727.96 हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित क्षेत्रातील पंचनाम्यांची कार्यवाही सुरू आहे. महसूल आणि कृषी विभागाच्या समन्वयातून प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांच्या नुकसानीची नोंद घेण्यात येत आहे.
याप्रसंगी अपर तहसीलदार सोनाली तेटगुरे, तालुका कृषी अधिकारी सुशील आडे, नायब तहसीलदार मधुकर काळे, मंडळ कृषी अधिकारी (चंदनखेडा) विकास चवले, मंडळ अधिकारी (मांगली) योगेश्वर गोहोकार, उप कृषी अधिकारी (सांख्यिकी) प्रवीण इंगळे, इफको टोकियो कंपनीचे जिल्हा व तालुका विमा प्रतिनिधी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, चंदनखेडा मंडळातील सर्व सहायक कृषी अधिकारी तसेच गावातील शेतकरी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment