भद्रावती रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत जैन समाजातील वृद्ध महिलेचा मृत्यू

भद्रावती | प्रतिनिधी जावेद शेख,
भद्रावती रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत जैन समाजातील ६६ वर्षीय वृद्ध महिला सोहनीदेवी श्रीश्रीमाल यांचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे जैन समाजात शोककळा पसरली असून, रेल्वे स्थानकावरील वृद्ध व दिव्यांग प्रवाशांसाठी आवश्यक सुविधांच्या अभावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.Elderly Jain woman dies after being hit by Vande Bharat Express at Bhadravati railway station

मिळालेल्या माहितीनुसार,अहमदाबाद निवासी सोहनीदेवी श्रीश्रीमाल या हैदराबाद-हजरत निजामुद्दीन दक्षिण एक्सप्रेसने भद्रावती रेल्वे स्थानकावर सकाळी ६.३० वाजताच्या उतरल्या होत्या. येथील प्रसिद्ध श्री केशरीया पार्श्वनाथ जैन मंदिरात दर्शनासाठी त्या आल्या होत्या. वृद्धावस्थेमुळे रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावरून जाणे त्यांना कठीण जात असल्याने त्या फलाट क्रमांक दोन वरून रस्त्याच्या दिशेने जात होत्या. याचवेळी न थांबता जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची त्यांना जबर धडक  बसली. या भीषण अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) देण्यात आली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून मृतदेह घटनास्थळावरून हलविल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना देण्यात आली होती किंवा नाही, याबाबत अधिकृत स्पष्टता मिळू शकलेली नाही. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडूनही घटनेबाबत सविस्तर माहिती उपलब्ध झालेली नाही.

वृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांसाठी सुविधांची मागणी

भद्रावती रेल्वे स्थानकावर वृद्ध, दिव्यांग आणि अंध प्रवाशांना सहजपणे एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर किंवा स्थानकाबाहेर जाता यावे, यासाठी पुरेशा सुविधा नसल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे. पादचारी पुलावरील चढ-उतार वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींसाठी त्रासदायक ठरत असल्याने स्थानकावर लिफ्ट किंवा अन्य सुलभ पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे.

रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना आणि सुलभ प्रवेशाची व्यवस्था असती, तर अशा प्रकारच्या दुर्घटनांचा धोका कमी करता आला असता, अशी भावना व्यक्त केली जात आहे. मात्र, या अपघाताचे नेमके कारण आणि त्यामध्ये कोणाची जबाबदारी आहे, हे अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होऊ शकेल.

रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
या दुर्दैवी घटनेनंतर रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था, वृद्ध व दिव्यांग प्रवाशांसाठीच्या सुविधा आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. रेल्वे प्रशासनाने घटनेची सखोल चौकशी करून आवश्यक ती माहिती सार्वजनिक करावी, तसेच स्थानकावर लिफ्ट, सुरक्षित मार्ग आणि अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

सोनीदेवी श्रीमाळ यांच्या आकस्मिक निधनामुळे जैन समाजात दुःख व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर दुपारी चार वाजता जैन मंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती आहे.

या घटनेमुळे रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि विशेषतः वृद्ध व दिव्यांग व्यक्तींच्या सोयीसुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment