नागपूर/प्रतिनिधी:
महानिर्मितीच्या औष्णिक वीज केंद्रात काम करताना त्यांनी कोळसा हाताळणी विभागात अनेक नाविन्यपूर्ण सुधारणात्मक बदल केले. ज्यामध्ये वॅगन टीपलर उलटविण्याच्या दिशेत सुधारणा, वॅगन अनलोड करण्यासाठी प्लॅटफॉर्म, व्ही टाईप व्हायपर उभारणी इत्यादी नाविन्यपूर्ण बदलांमुळे कोळसा डॅमरेजमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत झाली.
ओल्या कोळशामुळे यंत्रसामग्री, वीज उत्पादनावर होणारा परिणाम व पर्यायाने आर्थिक नुकसान लक्षात घेऊन संशोधनात्मक काम करण्यासाठी त्यांना उत्तम विषय मिळाला व त्यावर अधिक सखोल चिंतन व लिखाणाचे काम त्यांनी सुरु केले.
“वीज उत्पादनावर ओल्या कोळशाचे परिणाम व त्याच्या अनुकूल परिणामांसाठी मुल्यांकन”हा अभ्यासपूर्ण शोधप्रबंध त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सादर केला व नुकतेच श्री. रवींद्र गोहणे यांना नागपूर विद्यापीठाच्या १०६ व्या दीक्षांत समारंभात कविवर्य सुरेश भट सांस्कृतिक सभागृह नागपूर येथे पी.एच.डी. प्रदान करण्यात आली.
डॉ.रवींद्र गोहणे हे उच्चविद्या विभूषित असे व्यक्तिमत्व असून त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथून बी.ई.(मेकॅनिकल), नागपूर विद्यापीठातून एम.टेक.(ऊर्जा व्यवस्थापन पद्धती) आणि सी.एल.आय. मुंबई येथून औद्योगिक सुरक्षिततेचा आधुनिक पदविका अभ्यासक्रम प्राविण्यासह उत्तीर्ण केलेला आहे.
डॉ.रवींद्र गोहणे यांचे मूळगाव मकरधोकडा, तालुका उमरेड जिल्हा नागपूर असून सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झालेला आहे. संत चोखामेळा वसतिगृह नागपूर येथे शैक्षणिक कार्यकाळ, तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात सन १९८८ ला प्रभारक श्रेणी -१ या पदावर रुजू झाले. कोराडी प्रशिक्षण केंद्र, कोराडी वीज केंद्र, चंद्रपूर वीज केंद्र, प्रकल्प आणि नियोजन विभाग मुंबई, सौर ऊर्जा प्रकल्प मुंबई,परळी वीज केंद्र, खापरखेडा वीज केंद्र, पारस औष्णिक विद्युत केंद्र येथे विविध पदे त्यांनी भूषविली असून वीज क्षेत्राचा दांडगा अनुभव त्यांचा पाठीशी आहे.
महानिर्मितीचे वरिष्ठ व्यवस्थापन, मित्र सहकारी, कुटुंबियांकडून डॉ. रवींद्र गोहणे यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 comments:
Post a Comment