नागपूर/प्रतिनिधी:
जालना येथे झालेल्या २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनात नागपुरी म्हशीला संकरित व जातिवंत म्हैस म्हणून प्रथम क्रमांक मिळाला आहे. तर बेरारी जातीच्या शेळीला सुद्धा प्रथम क्रमांक मिळाला आहे.
या प्रदर्शनात देशातील प्रत्येक राज्यातून संकरित जातिवंत पशुधन शेतकऱ्यांसाठी ठेवण्यात आले होते. नागपूर जिल्ह्यातून पाच नागपुरी जातीच्या म्हशी, बेरारी शेळ्यांचा गट पाठविण्यात आला होता. काटोल तालुक्यातील कातलाबोडी येथील बाबाराव लक्ष्मण भड यांनी नागपुरी म्हैस प्रदर्शनात ठेवली होती. तर नागपूर तालुक्यातील शिवा गावातील देवराव माळू राऊत यांनी बेरारी जातीच्या शेळ्या प्रदर्शनात ठेवल्या होत्या. संकरित आणि जातिवंत पशुधनाच्या निकषानुसार नागपुरी म्हशीने प्रथम क्रमांक पटकाविला. बाबाराव भड यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. तर बेरारी जातीच्या शेळ्यांचे संगोपन करणारे देवराव राऊत यांना २५ हजार रुपये रोख पारितोषिक प्रदान करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुळकर यांनी दिली.(लोकमत)
0 comments:
Post a Comment