चंद्रपूर:-कोणतीही चर्चा न करता अवघ्या पाच मिनिटात अजेंड्यावरील सर्व ठराव मंजूर करून महापौर राखी कंचर्लावार यांनी सभागृह सोडल्यामुळे संतप्त झालेले नगरसेवक पप्पू देशमुख यांनी कचरा संकलन व वाहतुकीच्या निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचाराचे लेखी पुरावे सभागृहात फाडून महापौर कंचर्लावार यांच्या आसनावर फेकले. जोपर्यंत भ्रष्ट महापौर , उपमहापौर व आयुक्त यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होत नाही, त्यांना जेलमध्ये टाकत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी प्रतिज्ञा देशमुख यांनी सभागृहात घेतली. यावेळी पाच मिनिटात सभा आटोपून मंचावरून खाली उतरलेले उपमहापौर राहुल पावडे देशमुख यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे त्यांना उद्देशून बोलत होते. देशमुख यांनी उपमहापौर यांना आसन ग्रहण करून चर्चा करण्याचे आव्हान दिले.भ्रष्टाचाराच्या विरोधात पुरावे देऊ शकलो नाही तर नगरसेवक पदाचा राजीनामा देईल असे सुध्दा त्यांनी भर सभागृहात सांगितले.
100 कोटी रुपयांच्या कचरा संकलन व वाहतुकीच्या निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचारावर चर्चा टाळण्यासाठी महापौर राखी कंचर्लावार यांनी पळ काढला असा आरोप त्यांनी केला.
भ्रष्टाचाराच्या विविध आरोपांमुळे नेहमी वादाच्या भोवऱ्यात राहणारी चंद्रपूर महानगरपालिका आज आमसभेत झालेल्या एका प्रकारामुळे पुन्हा चर्चेत आलेली आहे.आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान आमसभेला सुरुवात झाल्यानंतर माजी महापौर अंजली घोटेकर यांनी चंद्रपूर महानगरपालिकेला स्वच्छते मध्ये 3 स्टार नामांकन मिळाल्यामुळे अभिनंदनाचा ठराव मांडला.यावर आक्षेप घेताना काँग्रेसच्या नगरसेविका सुनिता लोढीया यांनी शहरातील अस्वच्छता,मोकाट कुत्रे व डुक्कर याची परिस्थिती गंभीर असल्याचे निदर्शनास आणून दिले. यानंतर महापौर राखी कंचर्लावार एकामागून एक विषयाचे वाचन केले व ठराव मंजूर करण्याचा सपाटा लावला. 'महापौर मॅडम मला बोलायचे आहे, असे नगरसेवक देशमुख वारंवार त्यांना उद्देशून बोलत असतानाही महापौरांनी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे सभागृहात उपस्थित नगरसेवकांच्या हजेरी बुकावर सह्या झालेल्या नसताना अवघ्या 5 मिनिटात सर्व ठराव मंजूर करण्यात आले. या प्रकारानंतर काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांनी हजेरी बुकच फेकून दिले.नगरसेवकांच्या उपस्थितीची नोंद झालेली नसताना ठराव मंजूर करणे योग्य नसल्याचे सांगून अनेक नगरसेवकांनी महापौर कंचर्लावार यांच्या कृतीचा निषेध केला.
100 कोटी रुपयांच्या कचरा संकलन व वाहतुकीच्या निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचाराच्या चौकशी दरम्यान आयुक्त राजेश मोहिते यांनी
कंत्राटदाराला लाभ पोहोचविण्यासाठी शासनाला व उच्च न्यायालयात जाणिवपूर्वक चुकीची माहिती दिली. त्याचप्रमाणे न्यायालयाच्या आदेशाचा हेतुपुरस्सर चुकीचा अर्थ काढून तत्परतेने कार्यादेश देण्याचा प्रयत्न आयुक्त मोहिते करीत असल्याचा आरोप नगरसेवक पप्पू देशमुख यांनी पत्रकार परिषदेतून केला होता.यापूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी हा मुद्दा लावून धरला होता. मात्र आजच्या आमसभेमध्ये नगरसेवक देशमुख यांना या मुद्द्यावर बोलण्याची संधी द्यायची नाही असे कटकारस्थान आमसभेच्या एक दिवसापूर्वी झालेल्या पक्षाच्या बैठकीत भाजपने ठरविले होते अशी चर्चा आहे.
सभागृहात भ्रष्टाचाराचे पुरावे देऊनही कारवाई होत नसल्यामुळे कायदेशीर लढा देऊन तसेच जनतेच्या न्यायालयात जाऊन भ्रष्ट अधिकारी व पदाधिकारी यांना अद्दल घडविणार अशी शपथ देशमुख यांनी आमसभे दरम्यान सभागृहात घेतली.
0 comments:
Post a Comment