चंद्रपुर :-चंद्रपुर जिल्हयातील पोंभुर्णा, गोंडपिपरी, सिंदेवाही, सावली, कोरपना आणि जिवती या सहाही नगर पंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकविणारच असा दृढ विश्वास माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजयाच्या दृष्टीने अचुक नियोजन करून परिश्रमपूर्वक सहाही नगर पंचायतीवर विजय मिळवावा असे आवाहन त्यांनी केले.
दिनांक ६ डिसेंबर २०२१ रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नगर पंचायत निवडणूकीसंदर्भात तयारीबाबत झूम द्वारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, आ. किर्तीकुमार भांगडीया, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, अॅड. संजय धोटे, सुदर्शन निमकर, संजय गजपुरे, अजय दुबे, आशिष देवतळे, राम लाखिया, अल्का आत्राम , सर्व तालुकाध्यक्ष आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
निवडणूक जिंकणे हे आपले प्रमुख लक्ष्य असून यासाठी जनतेला आपला वाटावा असा कार्यक्षम उमेदवार निवडण्याबाबत आ. मुनगंटीवार यांनी सुचना केली. विरोधी मतांचे विभाजन होईल यादृष्टीने विशेष लक्ष द्यावे असेही ते म्हणाले. प्रत्येक उमेदवाराने किमान पाच वेळा मतदारांशी संपर्क व संवाद साधावा असे सांगत आपले परिचय पत्र ,विकास पुस्तिका, जाहीरनामा, आवाहन पत्र मतदारांमध्ये वितरीत करावे असेही सुचित केले. राज्यात भाजपाचे सरकार असताना नगर पंचायत क्षेत्रात विकासासाठी मोठया प्रमाणावर निधी देत विकासकामे केली गेली. त्याची माहिती मतदारांपर्यंत पोहचवावी तसेच केंद्रातील मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती देखील मतदारांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन त्यांनी केले. मतदार यादीच्या ऍप चा वापर करत समाजातील सर्व घटकांशी संपर्क व संवादावर भर द्यावा, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.
यावेळी निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने अचुक नियोजन करण्यासंदर्भात पदाधिका-यांना त्यांनी अनेक सुचना केल्या. काही पदाधिकारी व नेत्यांनी देखील यावेळी आपली मते मांडली.
0 comments:
Post a Comment