Ads

बल्‍लारपूर शहराला थ्री स्‍टार मानांकन मिळणे हा बल्‍लारपूरकर जनतेचा गौरव – आ. सुधीर मुनगंटीवार

It is the pride of the people of Ballarpur that the city of Ballarpur has been given a three star rating. Sudhir Mungantiwar
बल्लारपूर :- विकासाचे विविध टप्‍पे अनुभवणा-या बल्‍लारपूर शहराला थ्री स्‍टार मानांकन मिळणे हा बल्‍लारपूर शहरातील जनतेचा गौरव आहे . नगराध्‍यक्ष हरीश शर्मा आणि त्‍यांच्‍या सहकार्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक या शहराच्‍या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. निवडणूका जिंकणे हे आमचे लक्ष्‍य नसुन नागरिकांची मने जिंकणे हे आमचे लक्ष्‍य आहे. बल्‍लारपूर शहराच्‍या विकासाच्‍या माध्‍यमातुन नागरिकांची मने जिंकण्‍याचा प्रयत्‍न आम्‍ही केला आहे व सदैव करू असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दिनांक २१ डिसेंबर २०२१ रोजी बल्‍लारपूर शहरात नगर परिषदेच्‍या माध्‍यमातुन नेताजी सुभाषचंद्र बोस डिजीटल शाळेचे लोकार्पण, संरक्षण दलाचे प्रमुख शहीद जनरल बिपीन रावत, फिटनेस सेंटरचे लोकार्पण, महात्‍मा गांधी शाळा, सरदार पटेल शाळा, राजेंद्रप्रसाद शाळा, फकरूद्दीन अली अहमद या चार शाळांचे एकत्रीकरण करून नव्या शाळेचा शुभारंभ करण्‍यात आला. यानिमीत्‍ताने आयोजित सभेत आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल, माजी आमदार जैनुद्दीन जव्‍हेरी, नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, नगर परिषदेच्‍या उपाध्‍यक्ष सौ. मिना चौधरी, सभापती सारिका कनकम, अरूण वाघमारे, येलय्या दासरप, कमलेश शुक्‍ला, प्रभागाचे नगरसेवक भास्‍कर माकोडे, नगरसेविका उर्मिला बजगोती, अरूणा भटारकर, जयश्री मोहुर्ले, पुनम मोडक, आशा संगीडवार, शिवचंद द्विवेदी, भाजपा शहराध्‍यक्ष काशी सिंह, समीर केने, सतिश कनकम, नगर परिषदेचे उपमुख्‍याधिकारी जयवंत काटकर, मुख्‍याध्‍यापिका श्रीमती परचाके आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, बल्‍लारपूर शहराने माझ्यावर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. लोकप्रतिनिधीत्‍वाच्‍या या दिर्घकाळात मला अनेक सन्‍मान व पुरस्‍कार मिळाले. इंडिया टूडेचा सर्वोत्‍कृष्‍ट अर्थमंत्री पुरस्‍कार, लोकमतचा महाराष्‍ट्रीयन ऑफ द ईयर पुरस्‍कार, विक्रमी वृक्ष लागवडीच्‍या मोहीमेसाठी लिम्का बुक ऑफ रेकार्डचे पुरस्‍कार असे विविध पुरस्‍कार स्विकाराताना या शहरातील मतदारांना मी मनापासून धन्‍यवाद दिले आहे. कारण या पुरस्‍कारांचे खरे मानकरी येथील मतदार आहेत. १९९५ मध्‍ये जेव्‍हा प्रथमतः मला उमेदवारी देण्‍यात आली तेव्‍हा ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल यांच्‍यासह १४ जणांनी मला उमेदवारी मिळावी म्‍हणून पक्षाकडे आग्रह धरला. त्‍यांच्‍यामुळे मी आज या ठिकाणी उभा आहे, असेही आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले.

नुकताच लोकलेखा समितीचा शताब्‍दी महोत्‍सव सांसद भवनात झाला. यावेळी मी माझ्या भाषणात केलेला उल्‍लेख मला आठवतो. १९१९ मध्‍ये मोटेंगू रिफॉर्म कमिटी नेमण्‍यात आली. या माध्‍यमातुन लोकलेखा समितीची स्‍थापना करण्‍यात आली. १९२१ मध्‍ये देशाचे एकूण बजेट २०० करोड होते. आज बल्‍लारपूर व लगतच्‍या परिसराच्‍या विकासासाठी मी पाच पट जास्‍त रकमेचा निधी उपलब्‍ध केला आहे याचा मला गौरवाने उल्‍लेख करावासा वाटतो. बल्‍लारपूर शहरात व लगतच्‍या परिसरात अभूतपूर्व अशी विकासकामे करण्‍यात आली.

बल्‍लारपूर शहरानजिक देशातील 29 वी सैनिकी शाळा, देशातील सर्वोत्‍कृष्‍ट रेल्‍वे स्‍थानक, बल्‍लारपूर शहरामध्‍ये विकासकामांच्‍या श्रृंखलेत उपविभागीय अधिकारी कार्यालयाची निर्मीती, तहसिल कार्यालय इमारतीचे बांधकाम, पंचायत समिती इमारतीचे बांधकाम, विश्रामगृहाचे बांधकाम, डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्र, सुसज्‍ज नाटयगृह, विमानतळासारखे सुंदर बस स्‍थानक, राजवैभवी प्रवेशद्वाराची निर्मीती, स्‍मार्ट पोलिस स्‍टेशन, छटपूजा घाट, मुख्‍य मार्गांचे सिमेंटीकरण, डॉ श्‍यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाची निर्मीती, अत्‍याधुनिक भाजी मार्केटचे बांधकाम, ई-वाचनालय, बालोद्यानाची निर्मीती, नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम अशी विविध विकासकामे आम्‍ही पूर्णत्‍वास आणली याचा मला विशेष अभिमान आहे असेही ते यावेळी बोलताना म्‍हणाले.

मिशन शौर्यच्‍या माध्‍यमातुन चंद्रपूर जिल्‍हयातील आदिवासी विद्यार्थ्‍यांनी माऊंट एव्‍हरेस्‍ट सारखे उंच शिखर सर केले. या परिसरातील युवकांना क्रिडा विषयक नैपुण्‍य मिळावे यासाठी अत्‍याधुनिक स्‍टेडियमचे निर्माण आम्‍ही करविले. डिजीटल शाळेच्‍या माध्‍यमातुन विद्यार्थ्‍यांना उत्‍तम शिक्षण मिळावे यासाठी आम्‍ही यशस्‍वी प्रयत्‍न केले. या परिसराचा विकास करत सर्व घटकांना योग्‍य न्‍याय मिळावा यासाठी आम्‍ही सदैव प्रयत्‍नीशील राहू अशी ग्‍वाही त्‍यांनी यावेळी बोलताना दिली.

यावेळी बोलताना नगराध्‍यक्ष हरीश शर्मा म्‍हणाले, आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात व मार्गदर्शनात या शहराच्‍या विकासात नगराध्‍यक्ष म्‍हणून मी व माझे सहकारी भरीव योगदान देवू शकलो याचा आम्‍हाला अभिमान आहे. या शहराचा सर्वांगिण विकास आज नागरिक अनुभवत आहे त्‍याचे श्रेय सर्वस्‍वी आ. सुधीर मुनगंटीवार यांना जाते. त्‍यांच्‍यासारखा कार्यक्षम व विकासाभिमुख नेता आम्‍हाला लाभला हे आमचे भाग्‍य असल्‍याचे हरीश शर्मा म्‍हणाले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment