भद्रावती,दि.६(तालुका प्रतिनिधी):-
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका शाखा भद्रावती तर्फे तालुक्यातील धानोली येथील जि.प.प्राथ.शाळेच्या विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन वितरण करुन पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य रुपचंद धारणे उपस्थित होते.तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प.प्राथ.शाळा धानोलीचे मुख्याध्यापक प्रदीप आगलावे, सहाय्यक शिक्षक सुभाष मसराम, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे भद्रावती तालुका अध्यक्ष शंकर बोरघरे, तालुका सरचिटणीस अब्बास अजानी, तालुका संघटक जावेद शेख आणि सदस्य शंकर डे प्रभृती मंचावर उपस्थित होते.
सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मुख्याध्यापक प्रदीप आगलावे यांच्या हस्ते माता सरस्वती आणि आद्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते नोटबुक व पेन वितरण करण्यात आले. तसेच यावेळी मेंदूज्वर लसिकरणाकरीता उपस्थित असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र धानोलीच्या सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ.पिंपळकर, आरोग्य सहाय्यक तारा लिंगायत, आरोग्य सेविका एम.डी.किल्लेकर आणि आशा वर्कर माया ढाले यांचाही यावेळी आरोग्य सेवेबद्दल पत्रकार संघातर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रदीप आगलावे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारची पुस्तके वाचून आपल्या ज्ञानात भर पाडावी असा उपदेश केला. तसेच पत्रकार दिनानिमित्त म.रा.मराठी पत्रकार संघाने नोटबुक व पेन वितरणाचा उपक्रम घडवून आणल्याबद्दल पत्रकार संघाची प्रशंसा केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष रुपचंद धारणे यांनी पत्रकार दिनाबद्दल सविस्तर माहिती सांगून भविष्यात चांगले नागरिक होण्याकरिता व आपले सामान्य ज्ञान वाढविण्याकरिता नियमित वर्तमानपत्र वाचण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला दिला. तसेच पत्रकार संघाने आतापर्यंत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहितीही धारणे यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन व आभारप्रदर्शन सहाय्यक शिक्षक विलास खाडे यांनी केले.
0 comments:
Post a Comment