भद्रावती,दि.८(तालुका प्रतिनिधी) :-
अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन नुकतेच दिल्ली येथे एम.बी.ए.चे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचे डेंग्यूच्या आजाराने निधन झाल्याची घटना दि.७ जानेवारी रोजी घडली.
प्राप्त माहितीनुसार, येथील लोकमान्य विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक पांडुरंग बतकी यांचा मुलगा प्रणव हा दिल्ली येथे एम.बी.ए.चे शिक्षण घेत होता. याच वर्षी त्याने तेथे प्रवेश घेतला होता. दि.४ जानेवारी रोजी त्याला प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले होते. परंतू उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर दि.७ जानेवारी रोजी सकाळी १०.२० वाजता त्याचे निधन झाले. मृत्यूसमयी तो २७ वर्षाचा होता. त्याच्या पश्चात वडील, आई आणि भाऊ असा आप्त परिवार आहे.
प्रणय हा अभ्यासात हुशार मुलगा होता. त्याने नवोदय विद्यालय बाळापूर येथे नववी व दहावीचे शिक्षण घेतले होते. वरोरा येथे १२ वीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने इस्लामपूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायात पदवी घेतली. त्यानंतर त्याने पूणे येथे एल.ॲंड टी. कंपनीत चार वर्षे नोकरी केली. ती नोकरी सोडून तो याच वर्षी दिल्ली येथे एम.बी.ए. करायला गेला होता. मात्र नियतीला हे मान्य नसल्याने काळाने त्याच्यावर अचानक झडप घातली. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तो येथील लोकमान्य विद्यालयाचा आठवी पर्यंतचा माजी विद्यार्थी होता. त्याला विद्यालयातर्फे विद्यालयाच्या प्रांगणात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
0 comments:
Post a Comment