भद्रावती,दि.३(तालुका प्रतिनिधी):-
भद्रावती तालुक्यात वन परिसरात व शेतशिवारात वाघांचा धुमाकूळ चालू असतानाच दि.३ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास कोंढा आणि चालबर्डी या दोन गावांच्या वेशीवर पट्टेदार वाघिणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.
प्राप्त माहितीनुसार, कोंढा आणि चालबर्डी दोन्ही गावांच्या उत्तर दिशेला शिवपांदन रस्ता आहे. चालबर्डी गावापासून अंदाजे १ कि.मी. अंतरावर एक पट्टेदार वाघिण रस्त्यावरील खड्ड्यात मृतावस्थेत पडून होती. या रस्त्याने ये-जा करणा-या चालबर्डी येथील ग्रामस्थांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली. लगेच भद्रावतीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एच.पी.शेंडे आपल्या सहका-यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन वाघिणीचे शव ताब्यात घेऊन ते उत्तरीय तपासणीसाठी चंद्रपूरला पाठवले.पुढील तपास सुरु आहे.
दरम्यान,३० डिसेंबर रोजी रात्री तालुक्यातील मांगली (रै.) येथील शेतकरी कवडू महादेव बोंढे यांच्या शेतात विद्युत प्रवाहाचा स्पर्श होऊन तीन चितळ ठार झाले होते. तर दि.२ जानेवारी रोजी पहाटे वाघाने हल्ला करुन घोट निंबाळा येथील शेतकरी अनंता सीताराम रामटेके यांच्या गोठ्यातील वघार ठार केले.तसेच कोंढेगांव (मा.) परिसरात वाघाने धुमाकूळ घातला असून बकरे, गायी, बैल आणि माणसं यांच्यावर हल्ले होत असून ते गंभीर रित्या जखमी होत आहे.यासंदर्भात कोंढेगांववासियांनी नुकतेच एक निवेदन वनविभागाला सादर करुन वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
0 comments:
Post a Comment