चंद्रपुर :- छत्तीसगड वरून रोजगारासाठी नागपूरला मामाकडे यायला निघालेला एक तरुण चुकीने अर्ध्या रात्री चंद्रपूर रेल्वेस्थानकावर पोहोचला.अचानक एका नवीन शहरात आलेल्या परराज्यातील या तरुणाला गांजाची नशा करणाऱ्या भुरट्या चोरांनी हेरले. त्या तरूणाला मारहाण केली, त्याच्या अंगावरचे कपडे काढून घेतले व त्याच्या जवळचे 2000 रूपये आणि मोबाईल हिसकावला.अनोळखी शहरांमध्ये अर्ध्या रात्री अचानक झालेल्या प्रसंगाने या युवकाला धक्का बसला.मात्र दुसऱ्या दिवशी जनविकास सेनेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष अक्षय येरगुडे, महासचिव आकाश लोडे व गितेश शेंडे यांनी या पिडित युवकाला डाॅक्टरकडे नेऊन त्याचेवर उपचार केले,त्याला नवीन कपडे भेट देऊन स्वखर्चाने रेल्वेचे तिकीट काढून या पीडित युवकाची सन्मानपूर्वक स्वगावी रवानगी केली.
प्रवासादरम्यान सोय म्हणून
जनविकास सेनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषा बोबडे यांनी स्वतःच्या घरून आणलेला जेवणाचा डबा पिडित युवकाला दिला. जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीने मात्र चंद्रपूर सोडतांना हा पीडित युवक सुखावलेला दिसला. आपल्या शहरात आलेल्या व्यक्तीला कोणत्याही वाईट गोष्टीसाठी नव्हे तर चांगल्या गोष्टीसाठी चंद्रपूरचे स्मरण राहावे या हेतुने ही छोटी मदत केल्याची भावना जन विकास युवा आघाडीचे अक्षय येरगुडे यांनी व्यक्त केली.
छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील चौकी तहसील मधील आटरा गावचा कैलासराम यादव नावाचा 29 वर्षीय बेरोजगार युवक घरी पत्नी व मुलाला सांगून 18 जानेवारीच्या ट्रेनने रोजगारासाठी नागपूरला मामाकडे जायला निघाला व चुकीने अर्ध्या रात्री चंद्रपूरच्या रेल्वे स्थानकावर पोहोचला.
रेल्वे पटरी वरून रेल्वेस्थानकाच्या दुसऱ्या बाजूला जाण्याच्या प्रयत्नात असताना नशा करणाऱ्या भुरट्या चोरांनी या युवकाला मारहाण करून लुटले,त्याच्या अंगावरील पॅन्ट आणि शर्टसुध्दा काढून घेतले.अचानक झालेल्या घटनेने भेदारलेला हा युवक अंतर्वस्त्रावर सकाळी रेल्वेपटरीच्य मार्गाने जनता कॉलेज चौकात पोहोचला.जनता कॉलेज चौकातील ऑटो चालकांनी विचारपूस केल्यानंतर या युवकाने त्यांना आपबिती सांगितली.
ऑटोचालक रमेश गोमासे, सुरेश टापरे , रवी डाहुले, सुरेश कुळसंगे, सुनिल आवळे व योगेश घुगुल यांनी या पीडित युवकाला तात्पुरते अंगावर घालण्यासाठी जुने कपडे देऊन ही बाब वडगाव प्रभागाचे नगरसेवक पप्पू देशमुख यांना कळविली.नगरसेवक देशमुख यांनी छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत कांतेश्वर थोटे या आपल्या परिचित व्यक्ती कडून पीडित युवकाच्या गावाची माहिती घेतली व स्थानिक आमदारांचा भ्रमणध्वनी क्रमांक घेतला. राजनांदगाव जिल्ह्यातील खुज्जी विधानसभा क्षेत्राच्या स्थानिक आमदार सौ.छन्नी चंदू साहू यांच्याशी नगरसेवक देशमुख यांनी मोबाइलवरून संपर्क साधला. थोड्यावेळात आमदार साहू यांनी सदर युवकाने दिलेली माहिती योग्य असल्याचे देशमुख यांना कळविले. त्यानंतर जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी या पीडित युवकाची दिनांक 20 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या एर्नाकुलम-बिलासपूर एक्प्रेसची स्वखर्चाने तिकिट काढून
सन्मानपूर्वक त्याची स्वगावी रवानगी केली.जनविकास सेनेचे कार्यकर्त्यांनी केलेल्या या सहकार्यामुळे मात्र चंद्रपूर सोडताना हा तरूण सुखावलेला दिसला.
0 comments:
Post a Comment