भद्रावती,दि.२(तालुका प्रतिनिधी):-
येथील ग्लोरियस अकॅडमीचे संचालक इम्रान पठाण यांच्या पत्नी अफरोज पठाण यांनी नुकतीच राज्य पात्रता परीक्षा (सेट) उत्तीर्ण केली असून त्या इतर गृहिणींसाठी आदर्श ठरल्या आहेत.
अफरोज यांचे एम. एस्सी.(भौतिकशास्त्र) बी. एड. पर्यंतचे शिक्षण झाले आहे. एम.एस्सी.च्या द्वितीय वर्षाला शिकत असतानाच त्यांचा इम्रानसोबत विवाह झाला. तरी पण त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. विवाहानंतर सासरी आल्यावर त्यांनी बी.एड. ही व्यावसायिक पदवी घेतली. नुकतीच त्यांनी राज्य पात्रता परीक्षा (सेट) उत्तीर्ण केली. त्यासाठी त्यांनी हैद्राबाद येथील यु. व्ही. फिजिक्स अकॅडमीचे संचालक नागेश्वर राव यांच्याकडे ६ महिने मार्गदर्शन घेतले. आचार्य पदवी घेण्याचा त्यांचा मानस असून त्यांनी त्यासाठी लागणारी पात्रता परीक्षा (पी.ई.टी.) उत्तीर्ण केली आहे.
त्यांना ५ वर्षांचा एक मुलगा असून त्याचे संगोपन करुन आणि घरची सर्व कामे सांभाळून उरलेल्या वेळात त्या अभ्यास करतात. कुटुंबातील एक स्त्री सुशिक्षित झाली तर ते कुटुंब सुशिक्षित होते. मनात इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही गृहिणीला उच्च शिक्षण घेणे कठीण नाही.अशी अफरोज यांची धारणा आहे. त्यांचे पती इम्रान पठाण हे सुध्दा जैव तंत्रज्ञान आणि प्राणीशास्त्र या विषयात एम.एस्सी. असून प्राणीशास्त्र विषयात एम. फील. केले आहे. त्यांनी सुद्धा राज्य पात्रता परीक्षा (सेट) उत्तीर्ण केली असून ते आचार्य पदवीसाठी लवकरच नोंदणी करणार आहेत.
अफरोज यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांचे सासरे अलिमखाॅं, सासू अमिनाखातून, पती इम्रान आणि आई शाहेदा नरुल सय्यद यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. विशेष म्हणजे अफरोज यांचे वडील त्या लहान असतानाच स्वर्गवासी झाल्याने त्यांच्या आईनेच त्यांना एम.एस्सी.पर्यंतचे शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. घरच्या मुलांनी आणि सुनांनी जेवढे जास्त शिकता येईल तेवढे शिकावे आम्ही आई-वडील सर्वोतोपरी सहकार्य करायला तयार आहोत. इतर कुटुंबातील आई-वडीलांनीसुद्धा आपल्या मुलांना आणि सुनांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले तर ते कुटुंब नक्कीच सुसंस्कारित आणि सुखी होऊ शकते असे मत अफरोज यांचे सासरे अलिमखाॅं पठाण यांनी व्यक्त केले.
0 comments:
Post a Comment