चंद्रपूर: सर्पदंश झाल्यानंतर अनेकजण अंधश्रध्देच्या आहारी जावून परिणाम भोगतात. अशावेळी सर्पदंशापासून उपचार आणि बचाव व्हावा, यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी यासाठी इको-प्रो च्या रामाळा तलाव कार्यालयात प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुंबई येथील स्नेक बाईट अँड हीलिंग एज्युकेशन सोसायटीच्या प्रियंका कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी इको-प्रो अध्यक्ष बंडू धोतरे यांनी प्रास्ताविक मार्गदर्शन केले.
सध्या समाजकार्य विभागाचे विस विद्यार्थी क्षेत्र कार्याशी संबधित इको-प्रो संस्थेचे कार्य समजून घेत असून सदर उपक्रम महविद्यालयाच्या अभ्यासक्रमचा भाग आहे. आज चंद्रपूर भेटिदरम्यान मुंबई येथील स्नेक बाईट अँड हीलिंग एज्युकेशन सोसायटीच्या प्रियंका कदम इको-प्रो संस्थेच्या कार्यालयास भेट दिली असता सर्पदंश, अंधश्रद्धा व उपचार याविषयी संवाद कार्यक्रम घेण्यात आला. इको-प्रो संस्था सर्पसंरक्षण, सर्पदंश जागृती सोबतच वन्यप्राणी, पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.
गावाकडे उपचाराच्या सुविधा नसतात. अशावेळी विषारी सापाने दंश केल्यास प्राथमिक उपचार केले पाहिजे. सर्पदंश होऊच नये यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. आपल्या घरी सापाला आमंत्रण मिळेल, असे अस्वच्छता, सापाचे खाद्य नसावे. स्वच्छता नियमित ठेवल्यास किटक, पाल, उंदीर येणार नाहीत. त्यामुळे साप आपल्या घराकडे वळणार नाही. कानाकोपर्यात हात घालताना सावधगिरी बाळगली पाहिजे, असे आवाहन प्रियंका कदम यांनी केले. यावेळी इको-प्रो चे बिमल शहा, सचिन धोतरे, रोशन शास्त्रकार, महेंद्र शेरकी व समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment