भद्रावती :-चंद्रपूर जिल्ह्यात १० दिवस अतिवृष्टी झाली. नदी नाले भरून वाहू लागले. महापुराचा वेढा पडला. शहर- गाव पाण्याखाली होतं. त्यामुळे या संकटाच्या काळात घरात बसून आढावा न घेता प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना घेऊन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पाहणी केली. आवश्यक ठिकाणी सूचना दिल्या. मदतीसाठी पाठपुरावा केला. पुरग्रस्तांचे आसू पुसण्यासाठी त्या पावसाची तमा न बाळगता सतत गावगाव फिरत आहेत.
वर्धा नदीपात्रातील पाणीपातळी वाढत असल्याने वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील 2600 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. लष्कर चे 1 पथक, एनडीआरएफचे 1 पथक, एसडीआरएफ ची 2 पथके आणि स्थानिक चमूच्या सहाय्याने नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. भद्रावती तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ३३९ घरांची पडझडीने नुकसान झाले. त्यासोबतच भद्रावती - वरोरा तालुक्यातील हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली असून अनेकांची पिके वाहून गेली आहेत. जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. त्वरित पंचनामे करून शेती, पडझडीने घरांचे नुकसान, मनुष्य व पशुधन हानीची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी त्यांनी शासन दरबारी पत्रव्यवहार सुरु केले.
भद्रावती तालुक्यातील डोलारा तलाव व चिरादेवी रेल्वे भागाची पाहणी केली. वंदली, माढेळी, वडगांव तसेच वर्धा नदीवरील धानोरा पूल, सभोवतालचे रस्ते, खांबाडा, कोसरसार तसेच माजरी, पळसगाव, पाताळा, माणगाव, थोरना, कोंडा, राळेगाव, पिपरी, विसलोन, चलबिदी, कोची, गोरजा, गुजळा या परिसरात अधिकाऱ्यांसोबत भेटी दिल्या.
यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी शिंदे, वरोरा तहसीलदार रोहन मकवाने, भद्रावती तहसीलदार अनिकेत सोनवणे, बीडीओ यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
कोरोना काळात जनजीवन विस्कळीत झाले होते. समाजातील प्रत्येक नागरिक त्रस्त होता. कोरोना नंतर समाजाची स्थिती सावरण्यास सुरुवात झाली होती. मात्र आता पुरस्थितीमुळे आणखी मोठे संकट निर्माण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून बी- बियाणे खरेदी केले होते. मात्र पुरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीतील लागवड केलेली पिके हि वाहून गेली. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. परंतु कर्जाचा पैसा हा शेतीत लावल्याने आता करायचे काय हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. अशा वेळी त्यांना धीर देण्याचे काम आमदार प्रतिभा धानोरकर करीत आहेत.
वरोरा - भद्रावती येथे मोठ्या प्रमाणात शेती करण्यात येते. त्यासोबतच तालुक्यातील मोठा भाग हा ग्रामीण आहे. या भागातील सुमारे ३३९ घरांची पडझड झाली आहे. त्यांच्या निवासाचा प्रश्न हा निर्माण झाला आहे. त्यासोबतच शेतकरी शेतीसोबत पाळीव जनावरे देखील पाळत असतात. परंतु या पुरामुळे त्यांचा देखील मृत्यू झाला आहे. त्यामुळे वरील बिकट परिस्थितीचा विचार करता शासनाने आर्थिक पॅकेज जाहीर करून दिलासा देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांनी ओला दुष्काळ जाहीर करून दिलासा देण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment