Ads

मतदार यादी अचूक होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी विनय गौडा

चंद्रपुर :निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. 9 नोव्हेंबर रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित केली जाईल. मतदारांनी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इ. तपशील तपासून मतदार यादी अचूक होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Citizens should cooperate to make the voter list accurate- Collector Vinay Gowda
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी पल्लवी घाटगे, नायब तहसीलदार (निवडणूक) लोकेश्वर गभणे उपस्थित होते.
आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी 1 जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, 1 जानेवारी किंवा त्याआधी 18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांनाच मतदार नोंदणी करता यायची. मात्र 2023 पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या एक तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 या कालावधीत विशेष मोहिमे अंतर्गत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.
9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 हा कालावधी मतदार नोंदणीचा असून एखाद्याच्या नावासंबंधी हरकती घेण्याचाही आहे. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अपात्र मतदारांची वगळणीही महत्त्वाची असते. विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने 19 व 20 नोव्हेंबर आणि 3 व 4 डिसेंबर या दिवशी राज्यभर विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच वंचित घटकांसाठी खास शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. महिला आणि दिव्यांग यांचे नाव नोंदणीसाठी 12 व 13 नोव्हेंबर रोजी, तर 26 व 27 नोव्हेंबर रोजी तृतीयपंथी नागरिक, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, आणि घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीचे नागरिक यांच्या नाव नोंदणीसाठी विशेष शिबिरे घेतली जातील. तसेच तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र संघटन, भारत स्काऊट यांच्या सहकार्याने राज्यभर मतदार नोंदणीची शिबिरे राबवण्यात येणार आहेत. शिवाय, मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा एन.व्ही.एस.पी., व्होटर पोर्टल या संकेतस्थळावर आणि व्होटर हेल्पलाईन या मोबाइल अॅपवर उपलब्ध आहेत.
ग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने 10 नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या दिवशी राज्यभरातील ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्यांतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी केली जाईल.
मतदार नोंदणीसाठी पात्र युवकांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, तसेच प्रत्येक मतदाराने प्रारूप मतदार यादीतील आपले तपशील अचूक आहेत का याची खात्री करून घ्यावी. या संधीचा लाभ घेऊन प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment