चंद्रपूर : नागपूर रोडवरील नानाजी नगरमधील सार्वजनिक दत्त मंदिराच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याने दत्त जयंती व महाप्रसाद कार्यक्रम गुरुवारी पार पडला. दत्त जयंती उत्सवामध्ये शहराच्या विविध भागातील हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. चंद्रपूर मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या पुढाकाराने सार्वजनिक दत्त मंदिरच्या परिसराचे झालेले सुशोभीकरण बघून भाविक सुखावले.
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त साई मंदिर पासून गजानन मंदिर मार्गापर्यंत विद्युत रोशनाई करण्यात आली. मंदिराच्या मार्गावर दोन्ही बाजूने रांगोळी काढण्यात आली. तसेच या संपूर्ण मार्गावर लावलेल्या ध्वनिक्षेपकावर दोन दिवस सुरू असलेल्या श्रीदत्तावरील गीतांमुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचे जाणवत होते. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या मंदिर व आसपासच्या परिसराचे अचानक बदललेले रूप पाहून दत्त जयंती उत्सवाला येणाऱ्या संपूर्ण शहरातील भक्तांच्या चेहऱ्यावर यावेळी वेगळाच आनंद दिसत होता. श्रीदत्ताच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी रांग लागली होती.
दहा हजारावर भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
दत्त जयंतीनिमित्त आयोजित महाप्रसादाचा शहराच्या विविध भागातील दहा हजारच्या जवळपास भाविकांनी लाभ घेतला. वडगाव प्रभागातील नानाजी नगर, दत्तनगर ,वडगाव जुनी वस्ती, साई मंदिर,बापट नगर , गजानन मंदिर,लक्ष्मी नगर इत्यादी परिसरातील अनेक युवक तसेच महिला-पुरुष कार्यकर्त्यांनी महाप्रसाद कार्यक्रमामध्ये सेवा दिली. नानाजी नगर महिला मंडळाच्या सर्व महिलांनी एकाच पिवळ्या रंगाची साडी परिधान करून भोजनदानामध्ये सेवा दिली. दत्त जयंती व महाप्रसादाकरिता सेवा देणाऱ्या सर्व नागरिकांचे आयोजन समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र येरगुडे ,सचिव व्यंकटेश उपगन्लावार, कोषाध्यक्ष नंदकिशोर पाहुणे व दिलीप मेहता यांनी आभार व्यक्त केले.
चंद्रमणी पेंटरची रांगोळी व करण साखरकरची लक्षवेधी एलईडी कलाकृती
गजानन मंदिर परिसरातील चंद्रमणी पेंटर नावाने प्रसिद्ध असलेले चंद्रमणी पाटील यांनी मंदिराच्या समोर श्रीदत्ताची रांगोळी काढली होती. रांगोळीचे ठिकाण भक्तांसाठी सेल्फी पॉइंट झाला होता. विशेष करून अनेक महिला रांगोळी जवळ सेल्फी काढताना दिसल्या.
मंदिराच्या आतील खांबावर करण साखरकर या युवा छायाचित्रकाराने एलईडी रोशनाईने श्रीदत्ताची प्रतिमा तयार केली होती.अत्यंत आकर्षक असलेली ही प्रतिमा सुद्धा भक्तांचे लक्ष वेधून घेत होती.
0 comments:
Post a Comment