चंद्रपूर :आदर्श आचारसंहिता भंग केल्याच्या प्रकरणात मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांचा बचाव करणारी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी एका वाहिनीला दिली. आयुक्त पालीवाल यांनी आदर्श आचार संहिता लागू होण्याच्या पूर्वी प्रसिद्धीस पाठवलेली 24 कोटी रुपयांची ई-निविदा दोन दिवसांच्या सलग सुट्ट्यांमुळे शासनाच्या वेबसाईटवर उशिरा प्रकाशित झाली. यापुढे असे होणार नाही याची दक्षता घेण्याची समज आयुक्त पालीवाल यांना दिली असुन सदर प्रकरण आता बंद केल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी एका वाहिनीला दिली.
यावर आता जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
जिल्हाधिकारी विनय गौडा चंद्रपूरचे जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत.या संवेदनशील पदावर काम करताना जिल्हाधिकाऱ्यांनी दिशाभूल करणारे वक्तव्य करून भ्रष्ट अधिकाऱ्याचा असा बचाव करणे योग्य नाही. तसेच या प्रकरणात आयुक्त पालीवाल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्यास त्याची प्रत व आयुक्तांकडून मिळालेले लेखी स्पष्टीकरण सार्वजनिक करावे असे खुले आव्हान देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवडणूक विभागाने आयुक्तांविरुद्ध कोणतीही रितसर कारवाई केली नाही, एवढेच नव्हे तर या प्रकरणातील मूळ तक्रारच आवक-जावृक विभागातून गहाळ झाली. नियम धाब्यावर बसवून निवडणूक विभागाची संपूर्ण यंत्रणा आयुक्त पालीवाल यांचा बचाव करीत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.
मनपा आयुक्तांनी हेतुपुरस्पर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप
16 मार्चला दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकी बाबत पत्रकार परिषद घेणार अशी घोषणा निवडणूक विभागाने एक दिवसापूर्वी केल्याने 16 मार्चला दुपारी 3 वाजेपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार अशी पूर्वकल्पना सर्व देशावासियांना 15 मार्चला मिळाली होती. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेच्या तारखेची घोषणा केली त्याच दिवशी 15 मार्च रोजी दुपारी मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी तडकाफडकी 3 वर्तमान पत्रांमध्ये 24 कोटीच्या वादग्रस्त कामाची जाहिरात दिली. ही जाहिरात 16 मार्चला सकाळी प्रकाशित झाली.जाहिरातीमध्ये सदर कामाची ई-निविदा 18 मार्चपासून शासनाच्या वेबसाईटवर प्रकाशित होणार असल्याचा स्पष्ट उल्लेख केला.16 मार्चपासून आचारसंहिता लागू होणार याची पूर्वकल्पना असताना आयुक्त पालीवाल यांनी 18 मार्चपासून ई-निविदा प्रक्रिया सुरू करणे नियमानुसार योग्य आहे का ? हा हेतूपुरस्पर केलेला आचारसंहिता भंग नव्हे का ? याचे उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावे अशी मागणी माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली आहे. आमचा आक्षेप हा 16 मार्च रोजी वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या कामाच्या जाहिरातीबाबत नसून आयुक्तांनी 18 मार्चपासून सुरू केलेल्या ई-निविदा प्रक्रिये बाबत आहे.आचारसंहितेचा भंग झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ई-निविदा प्रक्रिया तातडीने रद्द करण्याचे तोंडी निर्देश दिले. मात्र राजकीय दबावाखाली जिल्हाधिकारी मनपा आयुक्तांचा बचाव करीत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.
0 comments:
Post a Comment