भद्रावती तालुका प्रतिनिधी(जावेद शेख):-येथील लोकसेवा मंडळाद्वारे संचालित लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल लागला असून या कनिष्ठ महाविद्यालयाने आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे.
फेब्रुवारी २०२४ च्या बोर्डाच्या परीक्षेसाठी विज्ञान शाखेचे ८६ विद्यार्थी बसले होते. त्यात सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांत अंतरिक्ष लकडे या विद्यार्थ्यांने ८६.३३ टक्के गुण मिळवून कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला. तर पार्थ पंकज भास्करवार याने ८५ टक्के गुण मिळवून द्वितीय स्थान प्राप्त केले. तृतीय स्थान चेतन कडाम याने प्राप्त केले असून त्याला ८०.३३ टक्के गुण मिळाले आहेत.
तसेच कला शाखेचा निकाल ७६.०८ टक्के लागला असून कनिष्ठ महाविद्यालयातून व तालुक्यातून प्रथम येण्याचा मान रुचिता निपाने या विद्यार्थ्यीनीला मिळाला आहे. तिला ८५.५० टक्के गुण मिळाले आहेत. जिल्ह्यात कला शाखेतून ती तिसऱ्या स्थानावर आहे. तर द्वितीय स्थानाची मानकरी पल्लवी जिल्लेवार ही ठरली असून तिला ८३.५० टक्के गुण मिळाले आहेत. तसेच तृतीय स्थान सानिया चंदनखेडे या विद्यार्थ्यीनीने प्राप्त केले असून तिला ७२ टक्के गुण मिळाले आहेत.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसोबत लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार यांच्या हस्ते एका कार्यक्रमात पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन आणि पेढा भरवून सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष उल्हास भास्करवार, लोकसेवा मंडळाचे सदस्य माजी प्राचार्य गोपाळराव ठेंगणे, उमाकांत गुंडावार, संजय पारधे, पंकज भास्करवार, प्राचार्य सचिन सरपटवार, उपप्राचार्य रुपचंद धारणे, पर्यवेक्षक प्रफुल्ल वटे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षकांचा महत्वाचा वाटा असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सचिन सरपटवार यांनी केले. संचालन प्रा. अस्मिता झुलकंठीवार यांनी केले, तर पर्यवेक्षक प्रफुल्ल वटे यांनी आभार मानले.
0 comments:
Post a Comment