जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :-
ऐतिहासिक भद्रावती नगरीचे कुलदैवत असलेल्या शहरातील अतिप्राचीन भद्रनाग मंदिर म्हणजेच नागमंदिर हे विदर्भातील सर्वात मोठे नाग मंदिर आहे.आज पासून विदर्भात प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात नागपंचमी यात्रेसाठी यात्रेची सुरुवात होत असून या दिवशी या ऐतिहासिक मंदिरात लाखाच्या वर भाविकांचा जनसागर उसळणार आहे.
Devotees flock to the famous Naga Temple of Bhadravati.
भद्रावती शहराचे आराध्य दैवत असलेल्या भद्रनाग स्वामीचे चिंतामणी, मनाजी बोवा व अन्य असे पाच भाऊ असल्याचे सांगितल्या जाते. हे सर्व बंधू भद्रावती परिसरात विखुरलेले आहेत. भद्रनाग स्वामींचे हे मंदिर अत्यंत प्राचीन असून ते हेमाडपंथी बांधणीची आहे. वाकटाककालीन असलेले हे मंदिर गर्भगृह आणि सभागृह असे दोन भागात विभागलेले आहे. गर्भागृहात भद्रनाग शेष स्वामींची आकर्षक मूर्ती विराजमान आहे. सदर मंदिर परिसरात पिंडीच्या आकाराची पायऱ्यांची विहीर असून या विहिरीत साक्षात भद्रशेषाचे वास्तव्य असल्याची भाविकात श्रद्धा आहे. मंदिराच्या सभागृहात महादेवाची पिंड असून अन्य अनेक देवदेवतांच्या मुर्त्या स्थापित आहे. नागपंचमीच्या दिवशी या मंदिरात मोठी यात्रा भरत असून ही विदर्भातील सर्वात मोठी नागपंचमी यात्रा आहे. या दिवशी विदर्भातीलच नव्हे तर शेजारच्या मध्य प्रदेशातील भाविक मोठ्या प्रमाणात मंदिरात भद्रनाग स्वामींच्या दर्शनासाठी येत असतात. सदर मंदिर अतिशय जागृत असून भाविकांच्या मनोकामना पूर्ण येथे होतात अशी भाविकांमध्ये मान्यता आहे. त्यामुळे संपूर्ण विदर्भातून मोठ्या प्रमाणावर भाविक येथे नवस बोलण्यासाठी व तो फेडण्यासाठी येथे येत असतात. या यात्रेसाठी मंदिर विश्वस्त कमिटी सज्ज झाली असुन मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले आहे. येणाऱ्या भाविकांना भद्रनागाचे सहज व सुलभरीत्या दर्शन घेता यावे यासाठी मंदिर प्रशासनातर्फे आवश्यक त्या सुविधा केलेल्या आहेत.याशिवाय यात्रसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता पोलीस प्रशासनातर्फेही शहर तथा मंदिर परीसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
0 comments:
Post a Comment