सादिक थैम वरोरा : आताची पिढी बदललेली आहे. त्यामुळे सण साजरा करण्याच्या पद्धतीतही बदल झाला आहे. सण साजरा करताना धांगडधिंगा यावर या पिढीचा जास्त भर दिसून येतो. परंतु असे केल्याने सण व उत्सवाचे पावित्र्य राहत नाही. हे पावित्र्य ठेवण्याचे दायित्व आपल्यावरच असल्याने शांततेत आपण आपले सण साजरे केले पाहिजे. यासाठी शासन व समाज यांनी आखून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी आज वरोरा येथे केले.
पुढील महिन्यात येणाऱ्या सणांच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने विचार विनिमय करण्यासाठी आज २६ ऑगस्ट रोज सोमवारला येथील सिद्धी विनायक मंगल कार्यालयात पोलीस विभागातर्फे आयोजित सभेत त्या बोलत होत्या.
उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे,तहसीलदार योगेश कौटकर,पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्यासह महावितरण कंपनीचे बदकल, नगरपालिकेचे गजानन आत्राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सुनील बदकी, तालुक्यातील सरपंच, शहरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील व नागरिक उपस्थित होते.
या सभेत गणेशोत्सव, ईद ईद-ए-मिलाद, पोळा इत्यादी सणा दरम्यान तालुक्यात शांतता, कायदा व सुव्यवस्था ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या बाबींवर विचार करण्यात आला.
सामाजिक सलोखा व वातावरण बिघडू नये यासाठी सोशल मीडियावरही आपण लक्ष ठेवावे असेही आवाहन साटम यांनी केले.
उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाने आखून दिलेल्या मर्यादेचे पालन करण्याचे आवाहन केले.
पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांनी गणेशोत्सवा दरम्यान मंडळांनी पाळावयाच्या नियमां बाबत माहिती दिली.
गणेशोत्सवा दरम्यान उद्भवणाऱ्या समस्या व अडचणी शांतता कमिटीचे सदस्य व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश नासळे यांनी सभेचे संचालन तर सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मेश्राम यांनी उपस्थितांचे आभार मानले
0 comments:
Post a Comment