सादिक थैम वरोरा तालुका प्रतिनिधी:सध्या वरोरा नगर परिषदेत मुख्याधिकाऱ्याची पद जागा रिक्त असून, त्या ठिकाणी भद्रावती नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. मात्र, दोन्ही नगर परिषदांच्या कामाचा ताण वाढल्यामुळे मुख्याधिकारी वरोरा येथे नियमित उपस्थित राहू शकत नाहीत. परिणामी, नागरिकांच्या नागरी सुविधा आणि पायाभूत विकासाच्या कामांवर परिणाम होत आहे.
वरोरा शहरातील स्वच्छता, नाले व सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा, रस्ते, आणि इतर नागरी सुविधा यासारख्या क्षेत्रांमध्ये नागरिकांना वेळेवर सेवा मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता, वरोरा नगर परिषदेकरिता एक पूर्णवेळ व नियुक्त मुख्याधिकारी असणे अत्यावश्यक ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर करून वरोरा नगर परिषदेस कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमण्याची मागणी केली आहे. संबंधित विभागाने तातडीने निर्णय घेऊन वरोरावासीयांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment