(तालुका प्रतिनिधी):राजुरा तालुक्यातील कुसळ येथील पाईप रपटा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गावकऱ्यांच्या शेतात जाण्याचा रस्ता पूर्णतः बंद झाल्याने शेतीकामासाठी जाणे अशक्य झाले आहे.
“Cusal bridge washed away; Villagers outraged over substandard construction by G.R.I.L. Infra Company”
जीआरआयएल इन्फ्रा कंपनीने GRIL Infra Company राष्ट्रीय महामार्ग 353 बी अंतर्गत केलेल्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्याचे आरोप स्थानिकांनी केले आहेत. कंपनीने मंजुरीपेक्षा अधिक प्रमाणात रेती, मुरूम, दगड यांचे उत्खनन केल्याने अनेक नाल्यांचे डोह नष्ट झाले. पकडीगडम धरणाच्या मुख्य कालव्यालाही नुकसान पोहोचले असून नियंत्रण भिंती उद्ध्वस्त झाल्या आहेत.
पाटबंधारे विभागाच्या तक्रारीनंतर काही ठिकाणी नवीन भिंती बांधण्यात आल्या, मात्र हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने पहिल्याच पावसात कुसळ गावातील रपटा वाहून गेला.
गावकऱ्यांचा आरोप आहे की, अनेक ठिकाणी तलाव नसतानाही बनावट दाखले दाखवून शासनाची फसवणूक करण्यात आली. तसेच नियमबाह्य क्रशरमधील लाखो ब्रास गिट्टीचा वापर करून शासनाच्या तिजोरीला मोठा चुना लावण्यात आला.
या निकृष्ट कामामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून दुरुस्तीचा कुठलाही मागमूस नाही. सीएसआर निधीतून करण्यात आलेले रपटा बांधकाम पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने गावकरी संतप्त झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांना शेतात जाण्याचा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अन्यथा माथा फाटा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आबिद अली यांनी दिला आहे.
0 comments:
Post a Comment