चंद्रपूर | प्रतिनिधी:-
चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या धडक मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा आणि रामनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून रहमतनगर भागातील रेकॉर्डवरील गुन्हेगार मोहम्मद शादाब अब्दुल रऊफ शेख याच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ५७.२६० ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडरसह एकूण ४,१९,१००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई २२ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हा सापळा रचण्यात आला होता. आरोपी आपल्या घरात अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगून असल्याची खात्री झाल्यानंतर पंच व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छापा मारण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे रामनगर येथे एन.डी.पी.एस. ॲक्ट-१९८५ कलम-८ (क), २१ (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर करीत आहे.
पोलिसांची धडक मोहीम
अवैध धंदे व अंमली पदार्थांच्या विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन व अपर पोलिस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील विविध भागांत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोहीम सुरू आहे.
कारवाईतील अधिकारी व कर्मचारी
या यशस्वी कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, रामनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आसिफराजा शेख यांच्यासह उपनिरीक्षक, उपपोलीस निरीक्षक व अंमलदारांचा मोठा संघ सहभागी होता.
पोलिस अधीक्षकांचे आवाहन
अंमली पदार्थांची विक्री व सेवन ही समाजासाठी अत्यंत घातक बाब असून युवकांचे भविष्य उद्ध्वस्त करणारी आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या हालचालींबाबत पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे. संशयास्पद व्यक्ती किंवा हालचालीबाबत माहिती त्वरित चंद्रपूर पोलिसांच्या व्हॉट्सॲप क्रमांक ७८८७८९०१०० वर कळविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment