वरोरा/फैज पटेल दि. १५ ऑगस्ट :
देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कोरा (ता. समुद्रपूर, जि. वर्धा) येथील लाल नाला मध्यम प्रकल्प धरण देशभक्तीच्या प्रकाशात न्हाऊन निघाले. चंद्रपूर पाटबंधारे विभागांतर्गत लघु पाटबंधारे उपविभाग, वरोरा यांनी या धरणाच्या पाचही दरवाज्यांवर तिरंग्याच्या रंगसंगतीत विद्युत रोषणाई करून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधले.
ही रोषणाई सायंकाळी सुरू होताच परिसरात उपस्थित नागरिक व पाहुणे मंत्रमुग्ध झाले. हिरवा, पांढरा व केशरी अशा तिरंग्याच्या रंगछटांनी उजळलेले धरणाचे दरवाजे दूरवरूनही चमकत होते. स्थानिक ग्रामस्थांसोबत अनेकांनी या क्षणाचे छायाचित्रण करून सोशल मीडियावर शेअर केले.
या उपक्रमामध्ये अधीक्षक अभियंता श्री. झोड साहेब, कार्यकारी अभियंता सिंग साहेब, उपविभागीय अभियंता फुल्लावर साहेब, शाखा अभियंता सहारकार, बगुल साहेब तसेच विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी यांचा उल्लेखनीय सहभाग राहिला. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून हा उपक्रम यशस्वी झाला.
धरणाच्या परिसरात देशभक्तीपर गीतेही वाजविण्यात आली होती. त्यामुळे वातावरण अधिकच उत्साहवर्धक झाले. अनेक कुटुंबांनी मुलांसह धरण परिसराला भेट देत आकर्षक रोषणाईचा आनंद घेतला.
नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत, “धरणाच्या माध्यमातून राष्ट्रीय ध्वजाला अनोखा सन्मान मिळाला आहे. अशा रोषणाईमुळे पुढील पिढ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागविण्यास मदत होते”, अशा प्रतिक्रिया दिल्या.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला यंदाचा हा उपक्रम लोकांसाठी आकर्षणाचा विषय ठरला असून, दरवर्षी अशीच विद्युत रोषणाई करण्याची मागणी स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
0 comments:
Post a Comment