Ads

वरोऱ्यात गणेश विसर्जनाचा उत्सव भव्यदिव्य – शांतता व सौहार्दाचे अनोखे उदाहरण

सादिक थैम प्रतिनिधि वरोरा : दहा दिवस चाललेला गणेशोत्सव रविवारी भक्तीभाव, उत्साह आणि सांस्कृतिक रंगत यांच्यासह अविस्मरणीय आठवणी देऊन निरोप घेऊन गेला. शहरभर “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”च्या जयघोषात ढोल-ताशांचे निनाद, टाळ-मृदुंगांचे सूर आणि भजनांच्या गजराने वातावरण भारून गेले. गांधीसागर तलाव परिसरात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत गणेशमूर्तींचे विसर्जन सुरळीतरीत्या पार पडले.
Ganesh Visarjan festival in Varora is grand – a unique example of peace and harmony
पोलिस प्रशासनाची दक्षता आणि कडक सुरक्षा-विसर्जनाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाने काटेकोर बंदोबस्त ठेवला होता.
उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष बाकल यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक अजिंक्य तांबडे, उपनिरीक्षक अनिल मेश्राम, शरद भस्मे, गुप्तचर विभागाचे राजेश वर्हाडे यांच्यासह २० अधिकारी, तब्बल ३०० पोलिस कर्मचारी, होमगार्ड, दंगा नियंत्रण पथक व एसआरपीएफचे जवान सतत गस्त घालत होते.
याशिवाय ३५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने संपूर्ण विसर्जन मार्ग व तलाव परिसरावर लक्ष ठेवण्यात आले. पोलिसांचा हा काटेकोर बंदोबस्त नागरिकांनी समाधानाने अनुभवला.

नगरपालिकेची स्वच्छता मोहीम
नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक भूषण सालवटकर यांनी विशेष पथक तयार करून तलाव परिसरात मोठी स्वच्छता मोहीम राबवली.विसर्जनाच्या आदल्या दिवशीच संपूर्ण मार्गाची सफाई, कचऱ्याची विल्हेवाट, धुळीचे नियंत्रण तसेच दिवसभर स्वच्छता कर्मचारी सतत हजर ठेवण्यात आले होते.
अभियंता विशाल कामडी, बांधकाम अभियंता नयन जमदाडे व इतर कर्मचारी वर्गाने मेहनत घेऊन नागरिकांना स्वच्छ वातावरण मिळावे यासाठी सतत परिश्रम घेतले.

वीज व्यवस्थेची चोख तयारी
विसर्जन मार्गावर अखंडित वीजपुरवठा राहावा यासाठी वरोरा महावितरण कंपनीने विशेष पथक तैनात केले होते.
कनिष्ठ अभियंता प्रफुल्ल लालसरे यांच्या नेतृत्वाखाली तंत्रज्ञ आणि कर्मचारी दिवसभर दक्षतेने काम पाहत होते.
प्रकाशयोजना व्यवस्थित ठेवणे, आवश्यकतेनुसार तातडीने दुरुस्ती करणे आणि नागरिकांना कुठेही अंधार जाणवू न देणे याकडे विशेष लक्ष दिले गेले.
त्यामुळे विसर्जन मार्ग व तलाव परिसर सतत उजळून निघाला आणि संपूर्ण कार्यक्रम निर्विघ्नरीत्या पार पडला.

शोभायात्रांची रंगत आणि मानाचा गणपती-मित्र चौक, डोंगरावर चौक, पदमावार चौक आणि आंबेडकर चौकातून विविध मंडळांच्या शोभायात्रा निघाल्या.
नागरिक नाचत-गात, ढोल-ताशांच्या तालावर थिरकत, गुलाल उधळत बाप्पाला निरोप देत होते.यामध्ये शहरातील मानाचा गणपती मानला जाणारा विठ्ठल मंदिर गणेशोत्सव मंडळ तसेच हनुमान मंदिर गणेशोत्सव मंडळ विशेष आकर्षण ठरले.
शोभायात्रांमुळे संपूर्ण शहरात उत्साहाची लहर पसरली होती.

सत्कार समारंभ आणि सौहार्दाची मिसाल- विसर्जन मार्गावर सर्व राजकीय पक्षांनी स्वागत पंडाल उभारून गणेश मंडळ अध्यक्षांचा सत्कार केला.यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, मंडळ अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना शाल-श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
तसेच परंपरेप्रमाणे वरोऱ्याच्या मुस्लिम समाजाने कच्छी मशिदीसमोर मंडळ पदाधिकारी, पोलिस अधिकारी, नगरपालिका अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश दिला. या उपक्रमामुळे वरोऱ्यातील सामाजिक बंधुभावाचे अनोखे चित्र सर्वांसमोर आले.

सांस्कृतिक आणि पर्यावरणीय संदेश नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांनी गणेश मंडळांना भेट देऊन भजन व नृत्य सादर केले आणि सांस्कृतिक परंपरा व मूल्यांचा ठेवा जोपासला.
त्याचबरोबर झाडांची प्रतीकात्मक रोपे देऊन पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.
यामुळे तरुण पिढीला संस्कृतीसोबतच पर्यावरणाबद्दल जागरूकता मिळाली.

उत्सवाचा यशस्वी समारोप
पोलिस प्रशासनाचा काटेकोर बंदोबस्त, नगरपालिकेची स्वच्छता मोहीम, वरोरा महावितरण कंपनीची तत्पर सेवा आणि नागरिकांचा सहकार्यभाव यामुळे वरोऱ्यातील गणेश विसर्जन उत्सव सुरक्षित, शांततापूर्ण व संस्मरणीय ठरला.
गणेश भक्तांनी प्रशासनाच्या प्रयत्नांना दाद देत पुढेही अशीच सुव्यवस्था राखण्याची अपेक्षा व्यक्त केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment