चंद्रपूर :
बीएसएनएल कंपनीचे कॉपर केबल चोरी करणाऱ्या दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले. आरोपींकडून चोरीस गेलेला कॉपर केबलसह एकूण ४४ लाख ४८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
०८ सप्टेंबर रोजी बीएसएनएलच्या दुरसंचार विभागाचे कनिष्ठ अभियंता अभिजीत जिवणे (रा. नगीनाबाग, चंद्रपूर) यांनी रामनगर पोलीस ठाण्यात २४ लाख रुपयांच्या कॉपर केबल चोरीची तक्रार दाखल केली होती. त्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली. या दरम्यान कोसारा रोडवर उभ्या असलेल्या आयशर ट्रक (क्र. युपी-२४-बीटी-७०४६) मध्ये चोरीस गेलेला कॉपर केबल आढळून आला. तपासाअंती नरेंद्र सोरनसिंह मौर्या (२२, रा. उधैनी, उत्तरप्रदेश) आणि नाजीम शोख असमुद्दीन शेख (२६, रा. कलपीया, बदायु, उत्तरप्रदेश) या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींनी हेल्मेट, रिफ्लेक्टर जॅकेट व प्लॉस्टिक बॅरीकेटचा वापर करून स्वतःला कंत्राटी कामगार दाखवत दुरुस्तीच्या कामाच्या नावाखाली कॉपर केबल कापून नेल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
या कारवाईत कॉपर केबल किंमत २४ लाख, आयशर ट्रक तसेच इतर साहित्य असा एकूण ४४ लाख ४८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या पथकात सपोनि दिपक कॉक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनिल गौरकार यांच्यासह इतर जवानांचा समावेश होता.
0 comments:
Post a Comment