वरोरा जावेद शेख (ता.प्र.):-
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त बुधवारी (दि. ३ डिसेंबर २०२५) चंद्रपूर येथे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत आनंदवन येथील आनंद अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचा मान उंचावला.
Blind students from Anand Andha Vidyalaya, Anandvan, compete in the district level sports competition.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली. क्रीडा स्पर्धेत ८ ते १२ वयोगटातील २५ मीटर धावणीत वेदिका आत्राम व नेहल इड्डे यांनी ‘पासिंग द बॉल’ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत चमकदार कामगिरी केली.
१३ ते १६ वयोगटातील १०० मीटर धावणे व गोळाफेक स्पर्धेत मंगेश मोहुर्ले व कु. छकुली राठोड यांनी सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. त्यांच्या उल्लेखनीय खेळीच्या जोरावर त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बुद्धिबळ स्पर्धेतही ८ ते १२ वयोगटातील मोहीत धोटे व १३ ते १६ वयोगटातील हितेश सोनटक्के यांनी सुवर्णपदके जिंकत आपली गुणवत्ता सिद्ध केली असून ते राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
दृष्टी नसतानाही कलेने स्थिरता निर्माण करणाऱ्या ६ वीतील कु. अक्षरा गारघाटे हिने गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या मधुर आवाजाने मान्यवरांसह सर्व उपस्थितांची मने जिंकली.
विद्यार्थ्यांच्या यशामागे महारोगी सेवा समितीचे सचिव मा. डॉ. विकासभाऊ आमटे, संस्थेचे विश्वस्त सुधाकर कडू तसेच शाळेचे मुख्याध्यापक बांगडकर सर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.
जिल्हा स्टेडियम, चंद्रपूर येथे झालेल्या स्पर्धांचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मा. पुलकित सिंह यांच्या हस्ते पार पडले. प्रास्ताविक जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मा. धनंजय साळवे यांनी केले. सूत्रसंचालन संजय पेचे यांनी तर आभार केशव दुर्गे यांनी मानले.
या यशस्वी आयोजनासाठी साधना ठक, वर्षा उईके, आचार्य परमानंद तिराणिक, विलास कावनपुरे, शुभम काटकर, तनुजा सव्वाशेरे, शुभांगी उफ, शुभांगी महाकाळे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी जितेंद्र चुधरी यांचे विशेष सहकार्य लाभले.
सायंकाळी प्रियदर्शनी इंदिरा सभागृहात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध कलागुणांचे सादरीकरण करत दिव्यांग विद्यार्थ्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व शाळांना व विद्यार्थी गुणवंतांना मा. धनंजय साळवे यांच्या हस्ते वृक्ष भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
0 comments:
Post a Comment