चंद्रपूर | प्रतिनिधी:-
चंद्रपूर शहराचा महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जाणारा तुकुम परिसरातील डी.ओ.सी. रोड (एस.टी. वर्कशॉप चौक ते अय्यपा मंदिर रोड) सध्या धुळीच्या विळख्यात सापडला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लोकप्रतिनिधी विकासाचे मोठमोठे दावे करत असले, तरी प्रत्यक्षात मात्र या अंतर्गत रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे.A shower of development announcements, but a reign of dust on the internal roads!
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचलेल्या मातीमुळे वाहतुकीदरम्यान प्रचंड धूळ उडत असून नागरिकांना अक्षरशः धुळीचा सामना करावा लागत आहे. श्वास घेणेही कठीण झाले असून, रहिवाशांचा जीव कोंडला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावर नियमित साफसफाई न झाल्यामुळे, तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यातच अमृत-२ योजनेअंतर्गत सुरू असलेल्या खोदकामानंतर माती हटविण्यात आलेली नसल्याने रस्त्यावर मातीचे थर साचले आहेत. वाढती वाहतूक यामुळे धुळीचे प्रमाण अधिकच वाढले आहे.
या धुळीचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून अनेकांना श्वसनाचे विकार, अॅलर्जी, दम्याचे त्रास तसेच हृदयविकारासंबंधी समस्या निर्माण होत आहेत. याचा सर्वाधिक फटका शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच स्थानिक व्यापाऱ्यांना बसत आहे.
यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून खालील प्रश्न उपस्थित केले जात आहेत —
◾️चंद्रपूर महानगरपालिका प्रशासन नियमित रोड सफाईपासून वंचित ठेवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे का?
◾️माजी नगरसेवक, माजी महापौर व शासकीय बंगले असलेल्या भागात नियमित सफाई होते, मग इतर रस्त्यांकडे दुर्लक्ष का?
◾️नियमित कर भरूनही नागरिकांना आरोग्याच्या समस्या भोगाव्या लागत असतील, तर हा अन्याय नाही का?
स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही सफाई कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नियमित रोड सफाई, पाणी फवारणी व साचलेली माती हटवावी, अन्यथा नागरिक आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही दिला जात आहे.
0 comments:
Post a Comment