चंद्रपूर : महाशिवरात्री महोत्सवानिमित्त लालपेठ, भिवापूर वार्ड येथील सुमारे ३०० वर्षे पुरातन आणि महाराष्ट्रातील सर्वात विशाल मानल्या जाणाऱ्या महाशिवलिंग स्थळी आज सकाळी १०८ दांपत्यांच्या हस्ते भावपूर्ण महाआरती करण्यात आली. वेदमंत्रांच्या गजरात आणि ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
या वेळी आमदार किशोर जोरगेवार सहपत्नीक उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, मनीष महाराज आणि भाजप नेते अशोक जीवतोडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.Chandrapur Echoes with Chants of “Har Har Mahadev”; 108 Couples Perform Devotional Maha Aarti at 300-Year-Old Ancient Mahashivling Site
यावेळी बोलताना आमदार किशोरभाऊ जोरगेवार म्हणाले की, महाशिवरात्री हा आपल्या संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे. ३०० वर्षांची परंपरा लाभलेल्या या महाशिवलिंग स्थळी रुद्राभिषेक करण्याचे भाग्य लाभणे ही आनंदाची बाब आहे. या ठिकाणचा आध्यात्मिक वारसा जपणे आणि भाविकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.
मागील श्रावण महिन्यात येथे भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या माध्यमातून अनेक वर्षे भक्तांच्या नजरेआड राहिलेल्या या जागृत आणि अतिशय प्राचीन शिवलिंगाची ओळख राज्यभर पोहोचविण्याचे कार्य घडले. या कार्यक्रमास अमृता फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवून विधीवत पूजा केली होती, ही या स्थानाच्या वाढत्या धार्मिक महत्त्वाची साक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले.
चंद्रपूरच्या धार्मिक वैभवात भर घालणाऱ्या या स्थळाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प करण्यात आला असून, भाविकांसाठी अधिक सोयी-सुविधा, परिसराचा विकास आणि पवित्र स्थळाचा आध्यात्मिक वारसा जपण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाशिवरात्री निमित्त आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या संकल्पनेतून महाशिवलिंग मंदिर सेवा समिती आणि मित्र संघ क्रीडा मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळच्या महाआरतीनंतर मनोकामना पूर्ती महारुद्राभिषेक पार पडला. त्यानंतर विविध भाषिक भजन मंडळांच्या भजन कार्यक्रमांनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले. उद्या महाप्रसादाने या धार्मिक सोहळ्याचा समारोप होणार आहे.
0 comments:
Post a Comment