चंद्रपूर : शहरातील सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स व महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त पुढाकारातून जागतिक शांततेचा संदेश देणारा ऐतिहासिक विश्वविक्रम शनिवारी, दि. २८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता साकारण्यात आला. तब्बल १,३८१ विद्यार्थ्यांनी एकत्र येत शांततेचे प्रतीक असलेले ‘पीस साइन’ उभे केले. याची दखल घेत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने “मानवांच्या सहभागातून साकारलेले शांततेच्या चिन्हाचे जगातील सर्वात मोठे मानवी चित्र” असा अधिकृत विक्रम नोंदविला.
🌍 “Say No to War, Give Shape to Peace” — A Human Chain of 1,381 Students; Chandrapur Sets a World Record!
यापूर्वी हा विक्रम १,०७६ जणांच्या सहभागाने नोंदविण्यात आला होता. मात्र, चंद्रपूरातील या उपक्रमाने तो मोडीत काढत नवा इतिहास घडविला. चंद्रपूरच्या भूमीतून ‘युद्ध नव्हे, शांती हवी’ हा प्रभावी संदेश देण्यात आला.
सध्या जगात इस्त्राईल-अमेरिका व इराणमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या शांततेच्या संदेशातून जगातील सुमारे १८० देशांपर्यंत मानवतेचा, ऐक्याचा आणि बंधुत्वाचा संदेश पोहोचला, अशी भावना संस्थेचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर व उपाध्यक्ष पीयूष आंबटकर यांनी व्यक्त केली.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. विशेष म्हणजे, याच संस्थेने १ मार्च रोजी सात मिनिटांत २० लावण्या सादर करण्याचा आणखी एक विश्वविक्रम नोंदवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या उपक्रमामुळे चंद्रपूरचे नाव जागतिक पातळीवर झळकले असून, शिक्षणासोबत सामाजिक जाणीव जोपासणाऱ्या सोमय्या ग्रूपच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 comments:
Post a Comment